आतापर्यंत ४१ लाख झेंड्याचे वाटप; सदोष साडेचार लाख झेंडे बदलले

आतापर्यंत ४१ लाख झेंड्याचे वाटप; सदोष साडेचार लाख झेंडे बदलले

मुंबई – भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने १३ ते १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण मुंबई महानगरात घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. आतापर्यंत ४१ लाख झेंड्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी साडेचार लाख तिरंगा झेंडे हे सदोष आढळून आले आहेत. मात्र, पालिकेने ते पूरवठादाराला परत करून त्या बदल्यात नवीन झेंडे घेण्यात आले, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी पालिकेने सामाजिक उत्तर दायित्वातून आत्तापर्यंत सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. या अभियानाच्या अंतर्गत मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच, १०० वृक्ष, ६० विद्युत खांब, विविध थोर पुरुषांचे १९ पुतळ्या भवती तिरंगी व सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

पालिकेने या अभियानात लोकसहभागासाठी ४,५०० बॅनर्स, १,५०० स्टॅण्डीज, ३५० होर्डिंग्ज, सार्वजनिक उद्घोषणा, प्रभातफेरी, मेळावे, शाळांमधील स्पर्धा व इतर भरगच्च उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती सुरू केली आहे. सर्व मुंबईकरांनी, घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी व्हावे. राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा. या अभियानाचा कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज तिरंगा संस्मरणीय आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर)आशीष शर्मा यांनी केले आहे.

घरोघरी तिरंगा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज खरेदी करुन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मुंबई महापालिकेने स्वतः सुमारे ४० लाख राष्ट्रध्वज खरेदी केले. तर टाटा समुहाने १ लाख राष्ट्रध्वज महापालिकेला दिले आहेत, असे एकूण ४१ लाख राष्ट्रध्वज तिरंगा सर्व २४ विभाग कार्यालये आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी पोहोचविण्याचे कामकाज प्रशासनाने पार पाडले आहे. ४० लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे ४ लाख ५० राष्ट्रध्वज देखील तातडीने बदलून संबंधित पुरवठादाराकडून उपलब्ध करुन घेण्यात आले व त्यांचे वाटप करण्यात आले, असा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी मिळून सुमारे साडेचार हजार बॅनर्स, ३५० होर्डिंग्ज, सुमारे १०० डिजिटल होर्डिंग्ज, दीड हजार उभे फलक (स्टॅण्डीज), ३५० बसथांबा जाहिरात प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यासोबत सार्वजनिक ठिकाणे, व्यापारी संकुल, विविध कंपन्यांची कार्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी सांगितिक उद्घोषणा (जिंगल अनाऊंसमेंट) करण्यात येत आहे.

मुंबईतील विविध चित्रपटगृहातून चित्रपटांच्या प्रारंभी आणि मध्यंतरावेळी अभियान संदर्भातील दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात येत आहे. पालिकेच्या शाळांद्वारे देखील व्यापक प्रमाणावर उपक्रम राबविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरी, सामूहिक राष्ट्रगीत गायन, निबंध – चित्रकला – रांगोळी – वेशभूषा – भित्तीचित्रे – घोषवाक्ये यासारख्या स्पर्धांद्वारे घरोघरी तिरंगा अभियान संकल्पना सर्वत्र पोहोचविण्यात आली आहे. महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता विभागामार्फत एकूण २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामध्ये महापालिका पुरातन वास्तू ८, महानगरपालिका इमारती ८२, शासकीय इमारती ४८, खासगी इमारती १०५ याप्रमाणे इमारतींचा समावेश आहे.

पालिकेच्या उद्यान अधीक्षक कार्यालयामार्फत मुंबईतील १६५ ठिकाणी दिनांक १० ऑगस्टपासून अमृत महोत्सवी वृक्षारोपण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून त्यातून ३ हजार १७० वृक्ष लावण्यात येत आहेत.

First Published on: August 12, 2022 8:53 PM
Exit mobile version