आईला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन!

आईला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन!

छाया - गणेश करकुंडे

एखाद्याला कर्ज मिळवून देताना जमीनदारांचे आयुष्य कसे उध्वस्त होते याचे ज्वलंत उदाहरण आज ठाण्यात पहायला मिळाले. जामीन राहिलेल्या आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी तुषार रसाळ नामक युवकाला चक्क अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करावे लागले. तलावपाळी येथील नौकाविहार समोरील ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या दालनात आंदोलन केले.

तक्रारदार तुषार रसाळ हे ठाण्यातील बी केबिन परिसरात राहतात. त्यांची आई, जयश्री रसाळ या एमएससीबी मधून सहाय्यक लेखापाल पदावरून निवृत्त झाल्या. शशांक यादव आणि सहकर्जदार शंकर यादव यांनी ठाण्यातील ज्ञानदीप कोऑप क्रेडिट सोसायटीतुन दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ रोजी पाच लाख रुपये तारण कर्ज घेतले ज्यासाठी श्रीमती जयश्री रसाळ या जामीन राहिल्या. कर्जदाराचे काही हप्ते थकताच क्रेडिट सोसायटीने नोटीस काढून, जिल्हा उपनिबंधकांच्या मार्फत एकतर्फी निकाल लावून दिनांक २८ जुलै २०१७ पासून श्रीमती रसाळ यांच्या खात्यातून दरमहा रु.१५००० कापून घ्यायला सुरुवात केली. दिनांक ०२  एप्रिल २०१८ पासून क्रेडिट सोसायटीने सहजामीनदार मोहम्मद खलीफ यांच्या खात्यातून देखील पैसे कापून घ्यायला सुरुवात केली. मोहम्मद खलीफ यांनी RBI कडे तक्रार करताच क्रेडिट सोसायटीने कर्जदाराचे तारण ठेवलेल्या घराचे मूळप्रती करदाराला परत केल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली.

श्रीमती रसाळ या निवृत्त झाल्या असून त्यांच्या खात्यातून अन्यायकारक रित्या पैसे काढले जात असल्याच्या विरोधात त्यांनी अनेकदा तक्रार केल्या परंतु तोंडी आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. गेल्या दहा महिन्यात त्यांच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले असल्याने संतापलेल्या तुषार रसाळ यांनी ज्ञानदीप सोसायटीच्या कार्यालयात थेट धडक दिली व आपले कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. आईच्या न्याय्य हक्कासाठी आपण इथे आलो असून न्याय मिळाला नाहीतर आपण इथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. सदरच्या क्रेडिट सोसायटीचे अधिकारी पैसे खाऊन कर्जदाराला तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या मूळप्रती परत करून जामीनदाराला त्रास देत असल्याचा थेट आरोप देखील रसाळ यांनी केला.

First Published on: August 6, 2020 4:43 PM
Exit mobile version