ऐन निवडणुकीत दक्षिण मुंबईचा पाणी प्रश्न पेटला

ऐन निवडणुकीत दक्षिण मुंबईचा पाणी प्रश्न पेटला

जिजामाता नगरच्या रहिवाशांची महापौर निवासावर धडक

मुंबईत अनेक मतदारसंघात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला असताना दक्षिण मुंबईच्या मतदारसंघात सध्या पाणी प्रश्न पेटला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे रहिवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून भेडसावत असलेला पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. जिजामाता नगर येथे होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे येथील त्रस्त नागरिकांनी मंगळवारी मध्यरात्री थेट महापौर निवासस्थानावर धडक देत आक्रमक पवित्रा धारण केला, तर सोमवारी रात्री येथील नागरिकांनी दक्षिण मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी रात्री दीड वाजता धडक दिल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण पसरलेे.

दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी प्रश्न जिकरीचा झाला आहे. याठिकाणी सहा महिन्यांपूर्वी संध्याकाळी ८ ते ११ वाजता या वेळेत पाणी येत होते. मात्र सहा महिन्यांपासून महापालिकेने येथील पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केला आहे. नव्या वेळेनुसार आता याठिकाणी ९.३० ते ११ वाजेपर्यंत पाणी कमी दाबाने सोडण्यात येते. रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नगरसेवकांपासून ते स्थानिक आमदारांपर्यंत दाद मागितली. परंतु त्यांच्याकडे आश्वासनाखेरीज काहीही न मिळाल्याने आम्ही आक्रमक पवित्रा धारण केला असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दै. ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली.

एकीकडे पाणी प्रश्न पेटलेला असतानाच दक्षिण मुंबईत गुरुवारी बीडीडी चाळीतील रहिवाशांनी पुर्नविकासाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा धारण केल्याचे चित्र पहायला मिळाले. बीडीडी चाळीच्या पुर्नविकासाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने स्थानिकांनी प्रचारासाठी आलेल्या महायुतीच्या उमेदवारांना प्रवेश नाकारला. गुरुवारी ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी महायुतीच्या प्रचारासाठी येथे दाखल झालेले उमेदवार अरविंद सावंत यांना याठिकाणी प्रवेश नाकारला. जोपर्यंत पुर्नविकासाचा प्रश्न सुटत नाही. पुर्नविकासाच्या करारावर स्वाक्षरी होत नाही. तोपर्यंत मतदान नाही, असे फलकच याठिकाणी लावले. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव पसरला होता. पण पोलिसांनी याठिकाणी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

First Published on: April 18, 2019 4:04 AM
Exit mobile version