स्पोर्ट कार डिझायनर दिलीप छाब्रियाला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

स्पोर्ट कार डिझायनर दिलीप छाब्रियाला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बॉलिवूडमधील कार डिझायनर दिलीप छाब्रियाला

डिसी डिझाइन या कारचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक डीसी स्पोर्ट कार जप्त करण्यात आली आहे. फसवणूक आणि खोटे दस्तऐवज प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

देशातील स्पोर्ट कार बाबत हा पहिला फसवणुकीचा गुन्हा असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डीसी अवंतिका कारचे रजिस्ट्रेशन खोटं असून एकाच क्रमांकाच्या दोन डिसी अवंतिका कार आहेत. याचे रजिस्ट्रेशन चेन्नई आणि हरियाणा येथे करण्यात आले असून खोट्या दस्तावेज वापरून हे रजिस्ट्रेशन करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त भारंबे यांनी दिली आहे. ‘एकाच क्रमांकाच्या दोन कार आम्हाला मुंबईत आढळून आलेल्या होत्या. आम्ही माहिती काढली असता या कार चेन्नई आणि हरियाणा राज्यात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अधिक माहिती मिळवली असता त्यातील कारचे रजिस्ट्रेशन खोट्या दस्तावेज तयार करून देण्यात आले होते’, अशी माहिती भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुंबईत आढळून आलेल्या डिसी डिझाइन कार ही नरिमन पॉईंट ओबोरॉय हॉटेल या ठिकाणी असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी अधिकारी सचिन वाझे यांना मिळाली. वाझे यांच्या पथकाने सापळा लावला. मात्र, ही तेथून निघून गेली होती. दरम्यान हीच कार गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज येथे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून डिसी डिझाइन ही स्पोर्ट कार ताब्यात घेतली.

पोलिसांच्या तपासात या गाड्याचे डिझाइन आणि इतर रजिस्ट्रेशन डिसी डिझाइन दिलीप छाब्रिया यांनी केले असून डिसी डिझाइन कंपनीने एकाच रजिस्ट्रेशनने गाड्या विकल्या असल्याचे समोर आले आहे. तसेच बोगस कागदपत्रे वापरून या गाड्यावर घेण्यात आलेले कर्ज बेकायदेशीर असल्याचे समोर आहे.

संपूर्ण देशभरात एकूण १२७ डिसी डिझाईन कारचा घोटाळा समोर आला असून त्यातील ९० कारची माहिती समोर आली. तसेच हा घोटाळा २०१६ पासून सुरू आहे. एका कारची किंमत ४२ लाख असून जवळपास ४० कोटींचा हा घोटाळा असू शकतो, अशी माहितीभारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रकरणी दिलीप छाब्रिया आणि इतर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप छाब्रिया यांना सोमवारी अंधेरी एमआयडीसी येथून अटक करण्यात आली आहे. छाब्रिया यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – बॉलिवूडमधील कार डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक


 

First Published on: December 29, 2020 5:21 PM
Exit mobile version