SSCच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल; शिक्षकाला अटक!

SSCच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल; शिक्षकाला अटक!

प्रातिनिधिक फोटो

दहावीच्या विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा सुरु असून १५ मार्च रोजीचा विज्ञान – १ आणि विज्ञान – २, तसेच समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून या धक्कादायक घटनांनी शिक्षण वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शहर आणि नारपोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून शहर पोलिसांनी एका कोचिंग क्लास शिक्षकाला अटक केली आहे. वजीर हफिजूर रहेमान शेख (४० रा. वेताळपाडा) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याने मोबाईल व्हॉट्सअॅप ग्रुपवर १५ आणि १८ मार्च रोजी विज्ञान – १ आणि विज्ञान – २ या विषयांची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल करून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना पुरवल्याचे उघड झाले आहे. याबाबत ओरड वाढल्याने त्याची दखल शिक्षण विभागाने घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी शरद भीमराव खंडागळे यांनी बुधवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपींना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रात्री उशिराने या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी पोलीस पथकासोबत तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून कोचिंग क्लास शिक्षक वजीर शेख यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यामध्ये त्याने अन्य मार्गाने विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळवून त्या व्हॉट्सअॅपवर प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – अंध-बहिर्‍या विद्यार्थिनींनी लिहिला दहावीचा पेपर

३ विद्यार्थिनींच्या व्हॉट्सअॅपवर पेपर

अशीच दुसरी घटना काल्हेर, कोपर येथील परशुराम टावरे विद्यालयात बुधवारी उघडकीस आली आहे. समाजशास्त्र विषयाचा पेपर एका व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल झाला. शाळेत एसएससीची परीक्षा सुरु असताना प्रवेशद्वाराच्या बाहेर एका रिक्षामध्ये तीन विद्यार्थिनी मोबाईलमध्ये काहीतरी पाहात असल्याचे शिक्षिका विद्या पाटील यांच्या निदर्शनात आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्या रिक्षाजवळ जाऊन त्यांच्याकडील मोबाईल ताब्यात घेतले आणि त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये बुधवारी सुरू असलेल्या समाजशात्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीन शॉट काढलेले आढळून आले. त्यामुळे त्यांनी मोबाईल ताब्यात घेऊन याबाबत केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक गणेश पुंडलिक भोईर यांच्या निदर्शनास आणून दिले.
आमच्या परशुराम टावरे विद्यालय परीक्षा केंद्रावर अन्य शाळांचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पेपर असणाऱ्या मोबाईलधारक विद्यार्थिनींवर नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. भिवंडीत तीन प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या विषयांची पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आहे.
राजू पाटील, अध्यक्ष, परशुराम टावरे विद्यालय, भिवंडी  

विद्यार्थिनींवर अद्याप कारवाई नाही

त्यानंतर परीक्षा सुरु झाल्यावर वर्गात आलेल्या त्या तीन विद्यार्थिनींची अंगझडती घेतली, त्यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा समाजशात्र विषयाची प्रश्नपत्रिका आढळून आली. या गंभीर घटनेची बाब मुख्याध्यापक गणेश भोईर यांनी परीक्षा मंडळाला कळवली आणि नारपोली पोलीस ठाण्यात मोबाईलधारक विद्यार्थिनींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या मोबाईलधारक तिन्ही विद्यार्थिनी होलीमेरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी असून त्यांच्याकडे टॉपर्स ग्रुपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पोहोचल्याने त्यांना गुरुवारी चौकशीसाठी नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी बोलावून चौकशी केली. मात्र त्यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रलंबित आहे.
First Published on: March 21, 2019 8:39 PM
Exit mobile version