वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची झुंबड!

वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची झुंबड!

मुंबई महापालिकेतील रुजू होत असलेल्या अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रांची सक्ती न करता कामावर रुजू करून घेण्याची मागणी आता कर्मचारी संघटनांकडून होऊ लागली आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनसह दी म्युनिसिपल युनियननेही अशाप्रकारे मागणी प्रशासनाकडे केली आहे.

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन सादर करत, केंद्र व राज्य शासनाने कोरोना कोविड १९ संदर्भात जाहिर केलेल्या धोरणानुसारमार्च ते ३० सप्टेंबरच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रांची सक्ती करण्यात येवू नये आणि विनाविलंब कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याचे सक्त आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी झाली आहे. या कर्मचाऱ्यांना आता महापालिकेने एवढे दिवस गैरहजर असल्याबद्दल कार्यालयात रुजू होण्यापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वैद्यकीय परिक्षकांकडे वैद्यकीय चाचणीकरता पाठवण्यात आलेले आहे. त्यामुळे वैद्यकीय परिक्षकांच्या कार्यालयात झुंबड उडालेली आहे. परिणामी कर्मचारी कोरेाना बाधित होण्याचा धोका  अधिक वाढल्याचे धुरी यांनी या निवेदनात म्हटले आहे.

तर दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनीही यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. कोविडच्या या महामारीत कामगार, कर्मचाऱ्यांची नितांत गरज असताना तसेच मनुष्यबळ कमी पडत असताना त्यांना कामावर हजर करून घेणे तेवढेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सेवा नियम १९८९ प्रकरण तीन, नियम क्रमांक १नुसार सहा महिन्यांच्या आता शारीरिक पात्रता प्रमाणपत्र सादर करण्यासापेक्ष संबंधितांना कामावर त्वरीत हजर करून घेण्यात यावे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणे उचित होईल,असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेतील ५० वर्षांवरील अभियंते, डॉक्टर्स,व निमवैद्यकीय कर्मचारी,कामगार, कर्मचारी यांना थेट कोरोनासंदर्भातील कामांमध्ये नेमणूक न करण्याची मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी केली आहे. त्यांनी या निवेदनात, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी यांनी २९ मे २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने महापालिकेतील कर्मचाऱ्यांकरता महापालिका आयुक्तांनीही परिपत्रक जारी करावे अशी विनंती केली आहे. महापालिकेतील ५० वर्षांवरील अभियंत्यांना, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरुन तसेच मधुमेही, उच्च व कमी रक्तदाब, ह्दयविकार, मुत्रपिंड विकार आणि जीव घेणे आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट कोरोनाच्या उपाययोजनांची कामे करण्यासाठ नेमणूक करून नये,असे म्हटले आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला त्याने करकचून मिठी मारली आणि…!


First Published on: June 11, 2020 11:00 PM
Exit mobile version