शालेय मुलांची सहल जाणारच, स्थायी समितीने प्रस्ताव केला मंजूर

शालेय मुलांची सहल जाणारच, स्थायी समितीने प्रस्ताव केला मंजूर

महापालिका शाळांमधील इयत्ता चौथी व सातवीच्या मुलांची सहल विरारमधील वॉटर पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. शिक्षण समितीनंतर आता गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सहलीच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या मुलांसह महापालिकेच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनाही सहलीला न्यावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. यासाठी  सदस्यांच्या सुचनांचा विचार करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहे.

दरवर्षी आयोजित करण्यात येते सहल

मुंबई महापालिकेच्यावतीने प्रत्येक वर्षी शालेय मुलांची सहज आयोजित करण्यात येते. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विरार पूर्व येथील ग्रेट एस्केप वॉटर पार्क येथे सहल नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे वॉटर पार्क १० एकर जागेवर असून यामध्ये विविध प्रकारच्या स्लाईड,पूल, ६ थ्रीलिंग स्लाईड, टोरेंट वेव पूल, जंगल थीम मल्टी वॉटर प्ले सिस्टीम तसेच
मॅट रेसर, फनेल स्लाईड, डॅशिंग कार, तसेच गेम झोन आदी विविध प्रकारच्या खेळांचा त्यात समावेश आहे. येत्या जानेवारीपासून या सहलीला सुरुवात केली जाणार आहे.

विरोधकांनी केले सवाल

सहलीचा हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिकेच्या विशेष शाळांमधील मुलांनाही सहलीला न्यावे अशी मागणी केली. शिवाय पाणी आणि डोंगराच्या ठिकाणी शालेय सहल नेवू नयेत असे परिपत्रक असताना वॉटर पार्कच्या ठिकाणी कशी सहल नेली जाते असाही सवाल जाधव यांनी केला. तर भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी इयत्ता पाचवी व सहावीच्या मुलांना सहलीला का नेले जात नाही,असा सवाल केला. सपाचे रईस शेख यांनी विशेष शालेय मुलांना सहलीला न नेणे ही निंदनीय बाब असल्याचे सांगत त्यांनाही सहलीला न्यावे या मागणीचे समर्थन केले. भाजपाचे अभिजित सामंत यांनी वॉटरपार्कमधील पाण्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो, याची काळजी घ्यावी अशी सूचना केली. मात्र, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी आपल्या विनंतीनुसारच विरारच्या ग्रेट एस्केप वॉटर पार्कच्या ठिकाणी सहल आयोजित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्याठिकाणची समिती सदस्यांसह पाहणी केली आहे. यामध्ये दोन फुटांएवढेच पाणी आहे. याठिकाणी वर्षाला १० लाखांच्या आसपास शालेय मुले येत असल्याचे सांगत विशेष मुलांना सांभाळणे पालकांनाच कठीण होत असते. मग अशा अवस्थेत त्यांना नेणे जिकरीचे असल्याचे सांगितले. याचे राजुल पटेल यांनीही समर्थन केले. परंतु शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे अखेर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांच्या सुचनेची नोंद घेण्याचे निर्देश देत प्रस्ताव मंजूर केला.

सहलीला लागणारा एकूण खर्च

इयत्ता चौथी व इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांची संख्या : ७२ हजार
प्रति विद्यार्थी खर्च : ५८५ रुपये
सहलीचा एकूण खर्च : ४ कोटी २३ लाख ६१ हजार

First Published on: December 20, 2018 9:37 PM
Exit mobile version