‘लोकल सुरु करा’, अन्यथा अनुदान द्या

‘लोकल सुरु करा’, अन्यथा अनुदान द्या

मुंबईचे डबेवाले

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे लोकल सेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र, लोकल सेवा बंद केल्यामुळे अनेकांचे उद्योग, व्यवसाय देखील ठप्प झाले असून याचा सर्वात मोठा फटका हा डबेवाल्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी केंद्र सरकारकडे लोकल सुरु करा अन्यथा अनुदान द्या अशी मागणी केली आहे.

राज्यात अनलॉक ३ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. एसटी वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, मुंबईतील लोकल बंद आहेत. त्याचा मोठा फटका डबेवाल्यांना बसला आहे. विविध कार्यालयांत डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचे प्रवासाचे माध्यम हे लोकल ट्रेन आहे. मात्र, ती बंद असल्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

डबेवाल्यांचा नाइलाज आहे

सध्या मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शासकीय, निमशासकीय तसेच कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. त्यामुळे आता चाकरमानी डबेवाल्यांना फोन करुन डबे पोहोचवण्याची मागणी करत आहेत. पण, लोकलसेवा सुरु होत नाही तोपर्यंत डबेवाल्यांचा देखील नाइलाज आहे.

महिन्याला ३ हजार रुपये अनुदान द्या

ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ने केंद्र सरकारकडे लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच डबेवाल्यांचे काम ही अत्यावश्यक सेवा मानून लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या दोन्हीही मागण्या मान्य नसतील तर दर महिन्याला ३ हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

‘लोकल ही जशी मुंबईची लाइफलाइन आहे, तशीच ती डबेवाल्यांचीही लाइफलाइन आहे. ती सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही,’ असे असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Corona: २४ तासांत १५१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ५ जणांचा मृत्यू


 

First Published on: August 29, 2020 2:36 PM
Exit mobile version