ग्रामपंचायत काळातील कार्यालयातून मनपाचा कारभार सुरू

ग्रामपंचायत काळातील कार्यालयातून मनपाचा कारभार सुरू

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या संकल्पनेतून तब्बल २०० कोट्यवधी रुपये खर्च करत नवी मुंबई महापालिकेची भव्य दिव्य मुख्यालय इमारत उभी केली. मात्र त्याच वेळी विभाग कार्यालयांकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे ज्यांच्या माध्यमातून विभागाचा कारभार चालवला जातो, अशी विभाग कार्यालये आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. काही ठिकाणी विभाग कार्यालयांची दयनीय अवस्था झाली आहे.

तीन दिवसांपूर्वी कोपरखैरणे विभाग कार्यालयात अचानक एका कर्मचार्‍याच्या अंगावर पंखा पडला. मात्र त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही. पण अशा घटनांमुळे कर्मचार्‍यांचे प्राण जाण्याची शक्यता नाकारत येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांची नवी मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता आहे. त्यांनी नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोट्यवधीरुपये खर्च करून भव्य दिव्य अशी वास्तू उभारली. त्याची चर्चा भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही झाली. मात्र त्याच वेळी गणेश नाईक यांनी विभाग कार्यालयांकडे दुर्लक्ष केल्याने आजही विभाग कार्यालयांची फरफट सुरू आहे.
अनेक वर्षे बेलापूर विभाग कार्यालय उड्डाणपुलाखाली चालवण्यात आले. त्यानंतर ते जुने पालिका मुख्यालय असलेल्या इमारतीत हलवण्यात आले.नेरूळ विभाग कार्यालयालाही स्वतंत्र जागा नसल्याने तेही पालिकेच्या शाळेत चालवण्यात येत आहे. तुर्भे विभाग कार्यालयातही गेल्यावर्षी दोन महिलांवर प्लास्टर पडले होते. वाशी विभाग कार्यालयही अडगळीत असल्याने त्याचे स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे. कोपरखैरणे विभाग कार्यालयात नुकतीच पंखा पडण्याची घटना घडली. इतर विभाग कार्यालयातही अनेक समस्या असल्याने या ठिकाणांहून कारभार चालवताना अधिकार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

२६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या १४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. दिघा येथे ग्रामंपचायत काळामध्ये ज्या ठिकाणाहून कारभार हाकण्यात येत होता, त्याच ठिकाणाहून आताही पालिका कारभार हाकत आहे. या विभाग कार्यालयांमध्ये अधिकार्‍यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ज्या ठिकाणी अधिकारी बसत होते, तेथे प्रभाग समिती अध्यक्षांना दालन उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ऐरोली, दिघा या ठिकाणांच्या अधिकार्‍यांना विभाग कार्यालयांच्या बाहेर असणार्‍या जागेत बाकडे टाकून काम करावे लागत आहे.
दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे येथे दोन ते तीन कर्मचार्‍यांना बाजूला बसून काम करावे लागत आहे. तत्कालिन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वात प्रथम दिघा विभाग कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी विभाग कार्यालयांची दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली होती. या कार्यालयांमधील साधन सामुग्रीदेखील उघड्यावर पडली आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या डागडुजीवर खर्च करण्यात येतो. मात्र या ठिकाणी प्रशस्त व नियोजनबद्ध जागा करण्यासाठी कोणीच सरसावत नाही.

घणसोली येथील विभाग कार्यालयांच्या बाजूलाच स्मशानभूमी आहे. येथे गर्दी होते. त्यामुळे येथे येणार्‍या नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विभाग कार्यालयांच्या बाहेर असणार्‍या जागेत पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यांवर वाहने उभी करावी लागत आहे. दिघा, घणसोली या ठिकाणी पालिकेच्या विभाग अधिकार्‍यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. विभाग कार्यालयात शौचालयाचीदेखील कमतरता असल्याची आहे. याच विभाग कार्यालयात बाहेरून येणार्‍या नागरिकांचीही त्यामुळे कुंचबणा होते. बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते.

परिमंडळ -१च्या सहाय्यक आयुक्तांना बसण्यासाठी दालनच नसल्याचे निर्दशनास आले आहे. आठही विभाग कार्यालयांमध्ये कँटीनची सुविधा नाही. सुरक्षारक्षकांसाठी चेंजिंग रूम नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. मालमत्ता कर व पाणी देयके भरण्यासाठी येणार्‍या नागरिकांना उन्हाचा, पावसाचा मारा झेलत बिले भरावी लागत आहेत. विभाग कार्यालयदेखील पालिका मुख्यालयासारखे प्रशस्त असे करावे, अशी मागणी पालिका अधिकार्‍यांसह नागरिकांकडून केली जात आहे. आकृतीबंधाप्रमाणे एका विभाग कार्यालयात १२५ नागरिक बसणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ते बांधण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाचे काम म्हणजे ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’, असे आहे. करायचे म्हटले तर खूप काही करू शकते. मात्र काम करण्याची इच्छा नसल्याने आज ही अवस्था आहे. यावर लवकरच मनपा आयुक्तांची भेट घेऊन विभाग कार्यालयांच्या दुरवस्थेबाबत चर्चा करू.
– विजय चौगुले, विरोधी पक्ष नेता,नवी मुंबई महापालिका.

ज्या विभागात काही अडचणी आहेत अथवा त्या ठिकाणी अंतर्गत कामे करण्याची गरज आहे. त्या ठिकाणांची माहिती घेऊन कामे करण्यात येतील.
– रवींद्र पाटील, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका.

First Published on: November 6, 2018 1:55 AM
Exit mobile version