नायर हॉस्पिटल बाळ चोरी प्रकरण : आणि तिचा खोटारडेपणा समोर आला

नायर हॉस्पिटल बाळ चोरी प्रकरण : आणि तिचा खोटारडेपणा समोर आला

नायर हॉस्पिटल

नायर हॉस्पिटलमधून पाच दिवसाचे बाळ चोरी करुन गेलेल्या महिलेला पोलिसांनी ८ तासातच अटक केली आहे. घरी बाळंत सांगून ती सांताक्रूझ येथील व्ही.एन.देसाई हॉस्पिटलमध्ये चोरलेल्या बाळासह उपचारासाठी आली होती. मात्र, काही वेळातच तिचा खोटारडेपणा समोर आला आणि ती पकडली गेली. तिने डॉक्टरांनाच नाही तर पतीला देखील गरोदर असल्याचे सांगून ९ महिने अंधारात ठेवले होते, असे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

अशी केली बनवाबनवी

हेझल डोनाल्ड कोरिया (३७) असे बाळा चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. नालासोपारा येथे राहणारी हेझल हीचा डोनाल्ड कोरिया याच्यासोबत दुसरा विवाह झाला आहे. डोनाल्ड याचा नालासोपारा येथे रेती सिमेंटचा व्यवसाय आहे. हेझलला पहिल्या पतीपासून दोन मुले असून नवऱ्याने तिला सोडून दिले आहे. तिची दोन्ही मुले पहिल्या पतीसोबत राहतात. मात्र, हेझल दुसऱ्या पतीपासून  स्वतःचे  बाळ हवे होते.तसेच डोनाल्डच्या पतीने  तिच्याकडे मुलासाठी तगादा लावला होता, परंतु तिच्यात हार्मोन्सची कमी असल्यामुळे तिला बाळ होऊ शकत नव्हते. मात्र, हे जर डोनाल्डला कळाले तर तो आपल्याला सोडून देईल या भीतीने तिने गरोदर राहिल्याचे नाटक केले. ती शरीराने स्थूल असल्यामुळे तिच्या पोटाच्या आकारामुळे ती खरोखरच गरोदर असल्याचे डॉनाल्ड्ला वाटले होते. त्यामुळे त्यानेही तिच्यावर विश्वास ठेवला होता. जसजसे महिने उलटत होते, तसतशी तिची चिंता अधिकच वाढू लागली होती. आपला खोटारडेपणा समोर आला तर पती आपल्याला सोडून देईल या भीतीने तिने हॉस्पिटलमधून बाळ चोरण्याचा निर्णय घेतला.

तिने डॉक्टरांनाही फसवले

गुरुवारी ती हॉस्पिटलला तपासण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हेझल हि नायर रुग्णालयात आली होती. तिने प्रसुती वॉर्ड मध्ये शीतल साळवी या महिलेचे पाच दिवसाचे बाळ चोरी करण्याचा निश्चय केला आणि दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संधी मिळताच तिने बाळाला उचलून हॉस्पिटलमधून पळ काढला. हॉस्पिटलच्या बाहेरुन तिने टॅक्सीने सांताक्रूझ पूर्व येथील महानगर पालिकेचे व्ही.एन. देसाई हॉस्पिटल गाठले. तत्पूर्वी तिने पती डोनाल्डला आपल्याला बाळ झाले असल्याचे कळवले. व्ही.एन देसाई हॉस्पिटलच्या डॉक्टरांना तिने आपली प्रसूती घरी झाली असून त्रास होत असल्याने सांगितले. डॉक्टरांनी तिला तपासले असता त्यांना संशय आला, डॉक्टरांनी  हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात तैनात असणाऱ्या पोलीस शिपायाला कळवले. वाकोला पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गायकवाड यांनी नुकतेच व्हायरल झालेली नायर हॉस्पिटल मधील बाळा चोरीला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज बघितले आणि या महिलेला बघताच त्याने तिला ओळखले.

पोलीस शिपाई गायकवाड यांनी डॉक्टर सोबत चर्चा करून या महिलेला थांबून ठेवण्याची विनंती करून आग्रीपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सपोनि. नागेश पुराणिक, मपोउनि. जस्मिन मुल्ला यांनी व्हीएन देसाई हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन बाळाला आणि हेझल कोरिया हिला ताब्यात घेऊन बाळाला त्याची आई शीतल साळवी हिच्या ताब्यात देऊन हेझल कोरिया हिला अपहरणाच्या गुन्हयात अटक करण्यात आली.  शुक्रवारी तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – नायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ अखेर सापडले

हेही वाचा – CCTV – धक्कादायक! नायर रुग्णालयात महिलेने पळवलं बाळ!


 

First Published on: June 14, 2019 10:18 PM
Exit mobile version