शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी नवा मुहूर्त?

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी नवा मुहूर्त?

shivaji maharaj statue (File Photo)

शिवस्मारकाच्या भूमिपूजनादरम्यान झालेल्या अपघाताला दोन महिने पूर्ण होत नाही तोच आता शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा पुन्हा एकदा घाट घातला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यासाठी आता २० डिसेंबरचा मुहूर्त नक्की केला जात असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी ४ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण, भूमिपूजनासाठी हा वेळ अपुरा असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विनायक मेटेंना सांगितलं. त्यानंतर आता नवा मुहूर्त शोधला जात आहे. विनायक मेटे हे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आहेत. शिवाय, शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद देखील विनायक मेटे यांच्याकडे आहे. पण २० डिसेंबरपर्यंतचा कालावधी देखील शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी अपुराच आहे. इतक्या कमी वेळात तयारी होणार तरी कशी? असा सवाल देखील आता विचारला जात आहे.

भूमिपूजनादरम्यान अपघात

बुधवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी स्मारकाच्या पायाभरणीसाठी जात असताना स्पीड बोटला अपघात झाला होता. त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता. सिद्धेश पवार असं या तरुणाचं नाव होतं. दरम्यान, त्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवली गेली होती. तर, विनायक मेटेंना गप्प करण्यासाठी हा सारा डाव असल्याची चर्चा देखील रंगली आहे होती. उद्घाटनापूर्वी मेटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवस्मारकासंदर्भात लिहिलेलं पत्र देखील समोर आलं होतं. त्यामध्ये स्मारकाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी देखील विरोध केला होता. तुम्हाला जर शिवस्मारक बांधायचे असेल तर ते राजभवनाच्या जागी बांधा असे मत पुरूषोत्तम खेडेकर यांनी मांडले होते.

वाचा – ‘अरबी समुद्रातील शिवस्मारकाला पुरूषोत्तम खेडेकरांचा विरोध’

First Published on: December 17, 2018 2:42 PM
Exit mobile version