मास्कचा काळाबाजार आणि नकली सॅनिटायझर बनवणाऱ्यांवर होणार कारवाई

मास्कचा काळाबाजार आणि नकली सॅनिटायझर बनवणाऱ्यांवर होणार कारवाई

अनिल देशमुख, गृहमंत्री

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी अनेक नागरिकांनी मास्क तसेच सॅनिटायझर वापरणे सुरु केले आहे. असे असताना साठेबाजांनी मास्कची साठवणूक केल्याने मास्क महाग झाले आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नकली आणि निकृष्ठ दर्जाचे हॅन्ड सॅनिटायझर विकत असल्याचेही आढळून आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नकली सॅनिटायझर बनवणाऱ्यांच्या विरोधात कडक पाऊले उचलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मास्कचा काळाबाजार आणि नकली सॅनिटायझर बनवण्याचं कोण काम करत असेल तर अशांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न आणि औषध प्रशासनाकडून आलेल्या सूचनांनुसार गृहविभागातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यामध्ये मास्कचा काळाबाजार असेल किंवा नकली सॅनिटायझर असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई 

त्याचप्रमाणे फेसबुक,व्हाट्सअप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया साईटवरून खोटी माहिती, खोट्या बातम्या, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही गृहमंत्र्यानी सांगितले.

तुरुंगातील कैद्यांची तपासणी

करोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांचीही तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभागही स्थापन करण्यात येणार आहे. तुरुंगात करोना संशयित आढळल्यास त्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जाणार आहेत. अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

First Published on: March 14, 2020 8:11 PM
Exit mobile version