तरुणीबरोबर बाईकवर स्टंट, तरुणावर कारवाई

तरुणीबरोबर बाईकवर स्टंट, तरुणावर कारवाई

मुंबई : दोन मुलींना मोटरसायकलवर बसवून धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी (२ एप्रिल) एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा तरुण हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये तरुणाने एका तरुणीला पेट्रोलच्या टाकीवर बसवले आहे, तर दुसऱ्या तरुणीला पाठीमागे बसवलं आहे. दोन्ही तरुणींना बाईकवर मागे पुढे बसवून हा तरुण गाडी चालवताना दिसतो आहे. हा तरुण फक्त मागच्या चाकावर वेगाने दुचाकी पळवताना आणि स्टंट करताना दिसतो आहे.

या तरुणाचा स्टंटचा व्हिडिओ पॅथहोल वॉरियर्स फाउंडेशन या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. ‘दोन तरुणींसह हेल्मेट नसलेला तरुण धोकादायक स्टंट करताना दिसला. या तरुणाला माहिती आहे की, मुंबईतील रस्ते आता पॅथहोल फ्री झाले आहेत. कृपया यांना पकडा’, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी व्हिडिओतील तिघांविरुद्ध कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, अलीकडेच आरोपीने दोन मुलींसोबत दुचाकीवर धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शहरातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात त्याने हा स्टंट केला. व्हिडिओ समोर आल्यानंतर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या व्हिडिओची चौकशी करून या तरुणाला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे या तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलम 308 (दोषी हत्येचा प्रयत्न) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

First Published on: April 3, 2023 1:55 PM
Exit mobile version