गतिमंद मुलाला घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांची धडपड

गतिमंद मुलाला घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांची धडपड

लोहमार्ग पोलिस

मुंबईत वेगवेगळ्या कारणास्तव बाहेरून मुले येतात. बर्‍याचदा गतिमंद मुले चुकून मुंबईत आल्यानंतर भरकटतात त्यामुळे त्यांचे हाल होतात. झारखंडमधून चुकून मुंबईत आलेल्या एका गतिमंद मुलाला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सुखरूपपणे घरी पोहोचवले आहे. या कामासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस माहिती हाती नसताना केवळ एका नावाचा आधार घेत झारखंड गाठले आणि ही मोहीम फत्ते केली.

डिसेंबर २०१८ मध्ये मुंबई सेंट्रल स्थानकात उपनगरीय गाडीत १७ वर्षांचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत पोलीस कर्मचार्‍यांना दिसला होता. त्याच्यासोबत कुणीही नसल्याने त्याच्या हालचालींकडे बघून तो गतिमंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. या मुलाकडून त्याचे नाव आणि पत्ता माहीत करून घेण्याचा पोलिसांनी बराच प्रयत्न केला. मात्र, तो कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास असमर्थ होता. त्याच्या तोंडून केवळ मनिका हा एकच शब्द पोलिसांना वारंवार ऐकण्यास मिळत होता.

पोलिसांना सुरुवातीला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. मात्र, इंटरनेटच्या मदतीने शोध घेतला असता मनिका नावाचे झारखंडमध्ये गाव असल्याचे समोर आले. त्यानुसार मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ तेथील मनिका स्थानिक पोलिसांशी संपर्क करत तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे का, याची माहिती मिळवली आणि त्याचे फोटो तिथल्या पोलिसांना पाठवून तो सापडला असल्याची माहिती दिली. नंदलाल शंकर प्रसाद (१७) असे या मुलाचे नाव असून, तो गतिमंद असल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले. एक महिन्यापूर्वी तो खाऊसाठी पैसे घेऊन घरातून बाहेर पडला. पण, घरी परतला नसल्याने घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पण, मुंबई सेंट्रल पोलिसांनी केलेल्या धडपडीमुळे त्याला सुखरूप घरी पोहोचवण्यात आले असल्याचे मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.

First Published on: January 18, 2019 4:18 AM
Exit mobile version