‘मिस टीन वर्ल्ड’ सुष्मिताचे कल्याणमध्ये जल्लोषात स्वागत

‘मिस टीन वर्ल्ड’ सुष्मिताचे कल्याणमध्ये जल्लोषात स्वागत

'मिस टीन वर्ल्ड' सुष्मिता सिंग

अमेरिकेत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय विश्वसुंदरी’ स्पर्धेत ‘मिस टीन वर्ल्ड’ ठरलेल्या सुष्मिता सिंगचे नुकतेच कल्याणमध्ये आगमन झाले. यावेळी कल्याणकरांनी लेझीम ढोल-ताशांच्या गजरात सुष्मिताचे स्वागत केले. कल्याण बिझनेस कम्युनिटीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेत ‘नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, आमदार नरेंद्र पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘मिस टीन वर्ल्ड’ सुष्मिताचे भरभरून कौतुक करण्यात आले. सुष्मिताच्या नागरी सत्कार समारंभावेळी उपस्थित तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

अमेरिकेतील एल साल्वाडोर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुष्मिताने ‘मिस टीन वर्ल्ड’चा मुकूट पटकावत देशासह कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अठरा वर्षीय सुष्मिता ही मास मिडीयाची विद्यार्थिनी आहे. तल्लख बुद्धी, आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणा या गुणांमुळे सुष्मिताने या स्पर्धेत भारताची मान उंचावली. स्पर्धकांचा स्वभाव, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, फॅशन, आरोग्य आणि सौंदर्य आदी निकषांच्या आधारे ही स्पर्धा पार पडली.

आई-वडिलांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास तसेच या क्षेत्रातील माझे गुरु मेलवीन नरोन्हा यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले.
सुष्मिता सिंग, ‘मिस टीन वर्ल्ड’

First Published on: June 24, 2019 5:25 PM
Exit mobile version