ठाणेकराची चौपाटी देहविक्री करणार्‍या महिला, गर्दुल्ल्याच्या विळख्यात

ठाणेकराची चौपाटी देहविक्री करणार्‍या महिला, गर्दुल्ल्याच्या विळख्यात

ठाणेकरांचे फेव्हरेट डेस्टिनेशन असलेल्या तलावपाळीवर देहविक्री करणार्‍या महिला, गर्दुल्ले आणि चरस पिणार्‍यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे सामान्य ठाणेकरांना तलावपाळीला जाणे नकोसे झाले आहे. या त्रासातून तलावपाळी मुक्त कधी होणार, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

तलावपाळी ही ठाण्याची प्रतीचौपाटी म्हणून ओळखली जाते. मासुंदा तलाव काठचा परिसर ठाणेकरांची फेरफटका मारण्याची व दोन क्षण निवांत घालवण्याची हक्काची जागा. दर ५ वर्षात तलावपाळीच्या सुशोभिकरणावर ठाणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, पुन्हा काही महिन्यातच या सुशोभीकरणाची वाटचाल बकालीकरणाकडे सुरू झालेली असते. त्यामुळे ठाणे पालिका हे कोट्यवधी रुपये नेमके कशासाठी खर्च करते, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. गेले वर्षभरापासून तलावपाळीचे सुशोभीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ठेकेदाराकडून हे काम कासवगतीने केले जात असूनही त्याला ताळ्यावर आणण्यासाठी अद्याप ठाणे पालिकेला अद्याप वेळ मिळालेला नाही.

तलावपाळीचा ताबा आजमितीला गर्दुल्ले, चरसी, भिक्षेकरी, बेघरांनी घेतला आहे. तलावपाळीच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्याच्या रक्षणासाठी ठाणे पालिकेचे २ खासगी सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. मात्र, या सुरक्षा रक्षकांचे कोणतेही नियंत्रण तलावपाळीच्या सुरक्षेवर नसते. त्यामुळे ते असले काय किंवा नसले काय, त्याने कसलाही फरक पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसराचेही सुशोभीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. तलावपाळीच्या पाण्यालाही अत्यंत उग्र वास असतो. त्याकडेही पालिकेने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यात तातडीने लक्ष घालावे व ठाणेकरांची चौपाटी पुन्हा एकदा जिवंत करावी अशी मागणी केली जात आहे.

अंधाराचा ‘गैर’ फायदा सर्वांना
कधी काळी रात्री ठाण्यातील तलावपाळीचे देखणे रुप भुरळ पाडणारे, डोळ्यांचे पारणे फेडणारे असे होते. मात्र आता ही तलावपाळी अंधारात हरवलेली असते. या अधांराचा गैरफायदा घेत या ठिकाणी अनैतिक प्रकार सुरू असतात. अंधारात बस्तान खुलेआम नशापाणी केले जात असते.

First Published on: February 17, 2020 5:49 AM
Exit mobile version