दिल्ली दरबारी आता ‘तमाशा’

दिल्ली दरबारी आता ‘तमाशा’

महाराष्ट्राची लोककला असलेल्या ‘तमाशा’चा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीतील राष्ट्रीय नाटय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थेट मुंबई गाठली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात महिनाभरापासून हे विद्यार्थी तमाशाचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून दिल्लीतील ‘अभिमंच’ येथे तमाशाचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लोककला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिल्ली दरबारात सादर होणार आहे.

राष्ट्रीय नाटय विद्यालय व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय नाटय विद्यालय दरवर्षी व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एका राज्यात पाठवून तेथील लोककलेचा अभ्यास करून सादरीकरणाची संधी देत असते. या वर्षी महाराष्ट्रातील लोकप्रिय, पारंपारिक ‘तमाशा’चे प्रशिक्षण घेऊन तमाशा सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तमाशा पाहता यावा यासाठी त्यांना नाशिक जिल्ह्यातील तामसवाडीतील वठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांचा ‘कनातीतला तमाशा’ तर रेश्मा व वर्षा परितेकर यांच्या ‘संगीत बारी’चा कार्यक्रम दाखवण्यात आला.

मुंबईतही या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कलाक्षेत्रातील विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यात प्रा. वामन केन्द्रे, अभिनेत्री सुषमा देशपांडे, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. शैलेश श्रीवास्तव, हिमानी शिवपुरी, शकुंतला नगरकर, हेमाली म्हात्रे, मेघा घाडगे अथंबर शिरढोणकर, डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. मिलिंद इनामदार, योगेश थोरात (नृत्य), सागर जोशी (ढोलकी) व सुभाष खराटे (हार्मोनियम) आणि कृष्णा मुसळे, विकास कोकाटे (ढोलकी) यांनी मार्गदर्शन केले.

मुंबईतही होणार प्रयोग
महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सहकार्याने प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून २० व २१ जानेवारीला मुंबईत तमाशाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हे प्रयोग दोन्ही दिवस सायंकाळी सहा वाजता सादर होणार आहेत. या तमाशातील गण, गवळण बतावणीचे लेखन डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले असून हिन्दी वगनाटय ‘खेल की का’चे लेखन डॉ. मिलिंद इनामदार यांनी केले आहे.

First Published on: January 16, 2020 6:02 AM
Exit mobile version