टीबीवर होणार रिसर्च, मुंबईत उभारणार रिसर्च सेंटर

टीबीवर होणार रिसर्च, मुंबईत उभारणार रिसर्च सेंटर

प्रातिनिधिक फोटो

मुंबईसह जगभरात सध्या टीबी रुग्णांची वाढती संख्या आहे. गेले कित्येक वर्ष टीबीवर कसल्याही प्रकारचं संशोधन झालेलं नाही‌. त्यामुळे, टीबीचा जंतू दिवसेंदिवस बळावत आहे. पण, आता लवकरच मुंबईत टीबीवर संशोधन करण्यासाठी रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याचा विचार मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याबाबत मंजुरी मिळाली की हे केंद्र मुंबईत उभारलं जाईल, असं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्वात जास्त मृत्यू हे टीबीमुळे

देशात सर्वात जास्त मृत्यू हे टीबीमुळे होतात. त्यामुळे सर्वांनीच टीबीमुक्त भारतासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यासोबतच २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत असं स्वप्न पंतप्रधान मोदी यांचं आहे. त्यानुसार सर्व अधिकारी कामाला ही लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून टीबीवर संशोधन करण्यासाठी मुंबईत लवकरच रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याचा विचार आहे.

” टीबीवर महापालिकेकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. पण, गेले कित्येक वर्ष टीबीवर संशोधन झालेलं नाही. त्यामुळेच, महापालिकेकडून टीबीवर संशोधन करण्यासाठी रिसर्च सेंटर बांधण्याचा विचार आहे. तसा केंद्राला प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. पण, अजूनही निर्णय आलेला नाही. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात येईल. ”
आय. ए‌. कुंदन, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

आतापर्यंत, मुंबईत ६ हजार ५०० एमडीआर टीबी रुग्ण आढळले आहेत. तर, एक्सडीआर टीबी रुग्णांची संख्या ५५० इतकी आहे. जे रूग्ण नियमित आणि वेळेवर औषध घेत नाहीत. औषधांच्या मात्रा चुकवतात, अशा रूग्णांच्या शरीरात औषधांना दाद न देणारे जंतू निर्माण होतात. परिणामी टीबीचं रूपांतर एमडीआर लेवलमध्ये होते. या रुग्णांना सरकारद्वारे मोफत निदान आणि औषधांची सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी सकस आहार न मिळाल्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट होऊन जाते. या सर्व बाबींचा विचार करून सरकारनं आरोग्यवर्धिनी योजना सुरू केली आहे. या एक्सडीआर आणि एमडीआर रुग्णांना मोफत पुरक पोषण आहार रेडी टू इट या स्वरूपात दिला जातो. काही वर्षांपूर्वी आम्ही झोपडपट्टयातील वस्त्यामध्ये जाऊन सर्व्हे केला. या सर्वेक्षणात सर्व प्रकारचे लोक आढळून आले. काही लोकांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्यामुळे पोषण आहार या योजनेला त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. पण, दोन वेळच्या जेवणाचीही ज्यांची परिस्थिती नसते त्यांनी या आहाराला नकार दर्शवला. त्यामुळे पौष्टिक आहार न मिळाल्यानं रुग्ण दगावू नये, यासाठी पालिका प्रशासनाद्वारे मोफत रेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे. याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, असंही कुंदन यांनी सांगितलं.

तर टीबीवर नवीन उपचार आणणं शक्य

टीबीच्या जंतूवर अभ्यास करण्यासाठी जर रिसर्च सेंटर उभारलं तर त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. ज्यामुळे दोन वर्षांत टीबीवर नवीन उपचार आणणं शक्य होईल. टीबीचे डॉक्टर नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवतील असा विश्वास शिवडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना व्यक्त केला आहे. तर, रिसर्च सेंटरमुळे टीबी रुग्णांना बराच फायदा होईल असंही डॉ. आनंदे यांनी सांगितलं आहे.

First Published on: July 5, 2018 8:58 PM
Exit mobile version