मुंबई, ठाणे, पालघरमधील मुलांवर क्षयरोगाची वक्रदृष्टी !

मुंबई, ठाणे, पालघरमधील मुलांवर क्षयरोगाची वक्रदृष्टी !

प्रातिनिधिक फोटो

मुंबई आणि आसपासचा परिसर हा सध्या टीबीच्या विळख्यात सापडला आहे. टीबीची लागण होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात आहे. . मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ दरम्यान राज्यात १ हजार ७०९ लहान मुलांना क्षयाची लागण झाल्याचे आढळले. ज्यात मुंबई, पालघर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांतील संख्या सर्वात जास्त आहे. २०१७ मध्ये मुंबईत क्षयाचे ४५ हजार ६७५ रुग्ण आढळले. मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ मध्ये ४ हजारांपेक्षा अधिक ड्रग रझिस्टंट म्हणजे औषधाला प्रतिसाद न देणारे रुग्णदेखील आढळून आले आहेत.

लहान मुले टीबीच्या विळख्यात

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील आरोग्य व्यवस्थापना (एचएमआईएस) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, टीबीच्या १ हजार ७०९ पैकी ६८५ म्हणजे ४० टक्के मुले मुंबईतील आहेत. तर ४५० पालघर आणि १०५ मुले ठाण्यात आढळली आहेत. राज्य क्षयरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख आणि राज्य आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी सांगितले की, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जिथे लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे तिथे क्षयाची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला क्षयाची लागण झाली असेल तर लहान मुलांना या आजाराच्या जीवाणूंचा संसर्ग लगेच होऊ शकतो.

पालघर, ठाणे या जिल्ह्यात ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांमध्ये क्षयाचे प्रमाण जास्त आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या भागातील मुलांना पोषक अन्न मिळत नाही. म्हणूनच राज्य सरकारने पालघरमध्ये छोट्या मुलांमध्ये क्षयाचा संसर्ग झाल्याचे वाटत असल्यास त्यांची सीबीनेट (टीबी टेस्ट) तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

टीबीशी लढण्यास आम्ही तयार

दरवर्षी राज्यात जवळपास १ लाख ७५ हजार नव्या क्षय रुग्णांची नोंद केली जाते. त्यांचे मोठ्या प्रमाणात रिपोर्टिंगही केले जाते. वेगवेगळ्या स्तरावर जाऊन क्षयावर प्रतिबंध घालण्यासाठी काम सुरू आहे. मुलांसाठी पोषण पुनर्वसन केंद्रेदेखील उघडण्यात आली आहेत. शिवाय दरवर्षी ५० हजार नवीन रुग्ण शोधण्याची गरज आहे. योग्य वेळी क्षयाचे निदान झाल्यास आणि उपचार मिळाल्यास लहान मुलांमधील लागण होण्याचे प्रमाण कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे.

डॉ. संजीव कांबळे, राज्य क्षयरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख

 

First Published on: May 18, 2018 7:13 AM
Exit mobile version