Corona: ‘मातोश्री’च्या दाराशी पोहोचला कोरोना; मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांचीही होणार चाचणी!

Corona: ‘मातोश्री’च्या दाराशी पोहोचला कोरोना; मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांचीही होणार चाचणी!

देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत अशी परिस्थिती असताना मुंबईत प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. वरळी-कोळीवाड्यापासून परिसर सील करायला सुरुवात झाली होती. आता ही यादी थेट मातोश्रीच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे. मात्र, याच निवासस्थानापासून अगदी जवळ असणाऱ्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच चहावाल्याकडे मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि मातोश्रीवरील इतर कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असत. त्यामुळे आता त्यांची देखील चाचणी होणार आहे. मातोश्री असलेला कलानगर भाग सील करण्यात आला आहे. दरम्यान, मातोश्रीवरचे १७० सुरक्षारक्षक बदलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर टपरी!

‘मातोश्री’ परिसरात असलेल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीची तक्रार जाणवू लागल्याने तातडीने त्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आता हाती आला असून त्यामध्ये संबंधित चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मातोश्रीच्या आसपासचा परिसर सील करण्यात आला आहे. ‘मातोश्री’पासून अगदी हाकेच्या अंतरावर ही चहाची टपरी आहे.

दारातलं संकट थेट मातोश्रीच्या आतमध्ये?

दरम्यान, या चहाच्या टपरीवरच मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि मातोश्रीवरचे कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे मातोश्रीच्या दाराशी आलेलं कोरोनाचं संकट थेट मातोश्रीमध्ये दाखल झालंय की काय? याची भिती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अंगरक्षक आणि मातोश्रीवरील इतर कर्मचारी यांची देखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा परिसर सील करण्यात आला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Corona – जगातील हे १२ विषाणू आहेत सर्वात धोकादायक!
First Published on: April 6, 2020 7:54 PM
Exit mobile version