केडीएमसी शिक्षकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

केडीएमसी शिक्षकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिका

महापालिका शाळा बंद करण्याच्या धोरणाला महापालिकेतील शिक्षकांच्या संघटनेने विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच शिक्षकांची देय वेतनश्रेणी लागू करणे, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती-वेतनोंन्नत्ती आदी मागण्या २७ फेब्रुवारीपर्यंत मान्य गेल्या नाहीत. तर २ मार्चला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आवारात धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने प्रशासनाला दिला आहे.

मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षक नाराजी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ३०० शिक्षक कार्यरत आहेत. हे वरिष्ठ वेतनश्रेणी १२ वर्षांपासून तर निवड वेतनश्रेणी २४ वर्षांपासून लागू होण्याची प्रतिक्षा करत आहेत. त्यांना ही वेतनश्रेणी त्वरीत लागू करावी, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती-वेतनोंन्नत्ती देण्यात यावी, अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करून त्याची अंमलबजावणी करावी, निवडणुकीची कामे शिक्षकांना देऊ नयेत, मेडिकलची बिले त्वरित मंजूर करावी, विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठीचे कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबविणे, निवृत्तीच्या दिवशीच शिक्षकांना त्यांची देणी देण्यात यावीत, शाळा सुरु होतानाच विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य देण्यात यावे आदी मागण्या प्राथमिक शिक्षक संघाने केल्या आहेत. या मागण्यांबाबत वेळोवेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊनही त्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

धरणे आंदोलन करणार

प्राथमिक शिक्षक संघाने या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखेरी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आमच्या मागण्या २७ फेब्रुवारी पर्यंत मान्य न केल्यास २ मार्चला महापालिका आवारात धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष नरेंद्र सोंजे, सचिव निलेश वाबळे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच पुरेशी पटसंख्या असतानाही महापालिका शाळा बंद करण्याला प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध असून महापालिकेच्या मालकीच्या शाळेत शाळा भरविण्यासाठी खाजगी संस्थांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्याची मागणीही शिक्षक संघटनेने केली आहे.

First Published on: February 22, 2019 10:23 PM
Exit mobile version