सुट्टी असताना शिक्षकांकडे रजेचे अर्ज मागितले

सुट्टी असताना शिक्षकांकडे रजेचे अर्ज मागितले

(प्रातिनिधिक चित्र)

मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही शिक्षकांकडून रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून येत आहेत. २५ जून रोजी विशेष सुट्टी दिल्यामुळे शिक्षकांच्या रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राच्या संदर्भानुसार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील सर्व शाळांना निवडणुकीसाठी सुट्टी दिली आहे. शिक्षक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा तसेच मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी २२ जून रोजी आदेश काढून शाळांना विशेष सुट्टी जाहीर केली होती.

शिक्षण उपसंचालकांकडे आवाहन

सुट्टी दिल्यामुळे मतदानाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. मुंबईतील अनेक शिक्षक येथे राहत नसल्याने ते मतदान करू शकले नाही. परंतू, कोकण पदवीधर मतदार संघात त्यांनी ठाणे, नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात मतदान केले. तरीदेखील मुंबईत दुसऱ्या दिवशी शाळा प्रशासनाने सीक लिव (सी.एल.) म्हणजेच किरकोळ रजेचा अर्ज मागितल्याच्या तक्रारी आल्या असून त्याची दखल घेत अनिल बोरनारे यांनी आज शिक्षण उपसंचालकांकडे शिक्षकांना शाळांनी अशा रजेच्या अर्जाची मागणी करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच त्याविषयी शाळांना पत्र देऊन संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.

गुरूवारी निकाल 

सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणूक २५ जून रोजी पार पडली. या निवडणुकीचे निकाल गुरूवार, २८ जून रोजी लागणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांत ही निवडणूक पार पडली असून विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे.

First Published on: June 27, 2018 4:43 PM
Exit mobile version