शिक्षकांना लोकल प्रवास नाहीच

शिक्षकांना लोकल प्रवास नाहीच

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शिक्षकांकडून लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत दहावीच्या शिक्षकांनी आंदोलन देखील केले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना शाळेत जावे लागते. त्यासाठी राज्य सरकारने शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अखेर ही मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला असून त्यामुळे या शिक्षकांपुढचा प्रवासासंदर्भातला पेच कायम राहिला आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर संबंधित जिल्हा किंवा महानगरपालिकेचा कोणत्या गटात समावेश होईल, हे ठरवलं जात आहे. मात्र, गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी कमी होऊन देखील मुंबईत तिसर्‍या गटाचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना निर्बंधांमधून सूट मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, पहिल्या आणि दुसर्‍या गटामध्ये लोकल प्रवासाचा समावेश आहे. मात्र, मुंबईत अजूनही तिसर्‍या गटाचे निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत मुंबईचा समावेश दुसर्‍या गटात होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देता येणार नाही. शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करण्यासाठी शाळांमध्ये कसे पोहोचणार? हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

First Published on: June 17, 2021 4:45 AM
Exit mobile version