शिक्षकांनाही लवकरच लोकल प्रवासाची मुभा

शिक्षकांनाही लवकरच लोकल प्रवासाची मुभा

शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना शाळेमध्ये उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना लोकलने प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता लवकरच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक वाहतूक फक्त कोरोना योद्धयांसाठीच सुरू होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षांचे निकाल जाहीर करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करून शाळा गाठावी लागत होती. शिक्षकांना लोकलमध्ये प्रवेशाची मुभा देण्यात यावी अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता नुकताच शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यातच २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये येता यावे, यासाठी राज्य सरकारच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलेल्या पत्रामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना शाळेत येता यावे यासाठी लोकलने प्रवेश करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे.

राज्य सरकारकडून आम्हाला असे कोणतेही पत्र मिळाले नाही. परंतु असे पत्र येताच आम्ही ते मंजुरीसाठी तातडीने वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
First Published on: November 11, 2020 5:47 PM
Exit mobile version