ठामपाच्या कारवाईत एक हजार 400 मालमत्ता जप्त

ठामपाच्या कारवाईत एक हजार 400 मालमत्ता जप्त

ठाणे महानगरपालिका

ठाणे महापालिकेने डिसेंबर महिन्यापासूनच कर थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 1 हजार 400 मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत 10 कोटींच्या घरात आहे. तर 1 हजार 200 मालमत्ता सील केल्या असून त्यांची किंमत अंदाजे नऊ कोटींच्या घरात आहे.

2018-19 या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम जमा केलेली नाही, अशांच्या मालमत्तांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रभागनिहाय कारवाई करण्यात येत आहे.

नागरिकांना मालमत्ताकर जमा करणे सोयीचे व्हावे, या दृष्टिकोनातून 1 डिसेंबर 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत महापालिकेची सर्व करसंकलन केंद्रे सार्वजनिक सुटीच्या दिवशी (21 मार्च 2019 वगळून) पूर्ण वेळ तसेच सर्व रविवारी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने करवसुलीची उपाययोजना तीव्र केली आहे. त्यानुसार, सद्यस्थितीत 410 कोटींचे लक्ष्य या विभागाने पार केले आहे. ज्यामध्ये 1400 मालमत्ता जप्त केल्या असून 1200 व्यावसायिक मालमत्ता सील केल्या आहेत. मात्र जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये एक हजारांच्या आसपास मालमत्ता या दिवा आणि मुंब्य्राच्या आहेत. तर सील करण्यात आलेल्या मालमत्तांमध्येसुद्धा एक हजारांच्या आसपास मालमत्ता याच भागातील आहेत.

First Published on: February 8, 2019 5:48 AM
Exit mobile version