व्यापार्‍याने पालिकेत भरली चिल्लर

व्यापार्‍याने पालिकेत भरली चिल्लर

vasai virar mahanagar palika

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या एका व्यापार्‍याला दंड ठोठावल्यानंतर त्याने चक्क पाच हजार रुपयांची चिल्लर पालिकेत भरली. ही चिल्लर मोजताना मात्र अधिकार्‍यांची चांगली दमछाक झाली. प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्याची मोहीम वसई-विरार महापालिकेने पुन्हा एकदा तीव्र केली असून या पिशव्यांचा वापर करणार्‍या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

अशीच मोहीम हाती घेतली असताना ओचोळे येथील अमित मेहता यांच्या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. त्यामुळे त्यांना पाच हजार रुपयांची दंडात्मक पावती पालिकेकडून देण्यात आली. ही रक्कम मेहता यांनी चिल्लरच्या स्वरुपात दिली. त्यात एक आणि दोन रुपयांची नाणी होती. ही नाणी मोजताना पालिका अधिकार्‍यांना मात्र वातानुकुलीत केबिनमध्येही घाम फुटला.

प्लास्टिक वापराच्या दंडची रक्कम प्लास्टिकच्याच पिशवीत

एकदा ही रक्कम मोजल्यावर त्यात काही रुपये कमी असल्याचे अधिकार्‍यांना आढळून आले. त्यामुळे पुन्हा एकदा ही नाणी मोजण्यात आली. त्यावेळी 70 रुपयांची तूट असल्याचे निदर्शनास आले. ही बाब मेहता यांना कळवल्यावर त्यांनी 70 रुपये पालिकेत जावून प्रामाणिकपणे भरल्याचे सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी सांगितले. पाच हजार रुपयांची दंडात्मक रक्कम मेहता यांनी प्लास्टिक बंदी मोडल्यामुळे ठोठावण्यात आली होती. मात्र, ही दंडात्मक रक्कम त्यांनी चिल्लरच्या स्वरुपात आणि तीही प्लास्टिकच्याच पिशवीत दिल्यामुळे वसई तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.

First Published on: December 8, 2018 4:56 AM
Exit mobile version