कळव्यात नालेसफाईचा बोजवारा

कळव्यात नालेसफाईचा बोजवारा

पावसाळा संपल्यानंतर तीन महिन्यानंतरही कळव्यातील नाले कचर्‍याने तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे कळव्यातील नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. कळवा येथील कावेरी सेतू परिसरातील नाल्यात मोठ्यप्रमाणावर कचरा जमा झाल्याने या परिसरात फिरायला येणार्‍या नागरीकांना नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे नाल्याच्या भिंती सुशोभित करण्यासाठीं रंगवल्या जात असताना महापालिका प्रशासनाचे कचर्‍याने तुंबलेल्या नाल्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. नालेसफाई ठेकेदारांनी नाला सफाई न केल्यामुळे त्याचा त्रास मात्र या परिसरात असलेल्या शाळेतील मुलांना नाल्याच्या दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास होत असून पालिकेच्या घनकचरा व्यव स्थापन विभाग नेमके काय करते? असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांचे पालक विचारात आहे. ठाणे शहरातील पावसाळा पूर्व नालेसफाईवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करत असते. इतक्या मोठ्या प्रमाणात नालेसफाई वर खर्च करण्यात आल्या नंतर शहरातील नाले स्वच्छ होतील ही ठाणेकरांची आशा फोल ठरली आहे.

शरातील नालेसफाई हा नेहेमीच चर्चेचा विषय ठरला आहे, पावसाळयात नालेसफाई च्या नावाखाली ठेकेदाराकडून होत असलेल्या हातसफाई बाबत अनेकदा प्रश्न उपस्थीत करण्यात येतात. नालेसफाई झाल्या नंतर संबंधीत विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त नालेसफाईची पाहणी करतात त्या नंतर शहरातील नाल्यांकडे कोणीही पुढच्या पावसाळ्या पर्यंत ढुंकून पाहत नाही अशी स्थिती आहे. कळवा प्रभाग आणि अनोगोंदीचा कारभार हे समिकरण काही नवे नाही. रस्ते. नाले, खड्डे याविषयींच्या समस्या वारंवार समोर येतात. तात्पुरती कारवाई किंवा कार्यवाही केली जाते. पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत या समस्या कळवेकरांच्या मागे येत राहतात.

कळव्यात देखील पावसाळया पुर्वी घाईघाईत नालेसफाई उरकण्यात आली. कावेरी सेतू परीसरात असलेला मोठा नाला कळवा रेल्वे स्थानक परिसरातून सांडपाणी वाहून आणतो. आकाराने मोठा असलेल्या या नाल्यात सांडपाणी या शिवाय इतर कचरा देखील मोठ्यप्रमाणावर टाकला जात असल्या मुळे अनेक वेळा नाल्याच्या प्रवाह अडकतो. प्लास्टिक आणि इतर काचर्‍या मुळे परीसरात उग्र दर्प पसरतो., परिणामी परीसरात असलेल्या नागरीकांना दुर्गंधीचा त्रास होतो. सध्या ठाणे शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी महापालिका प्रशसान कामाला लागले आहे. महापालिका आयुक्त स्वतः शहरातील विवीध भागातील स्वच्छतेचा आढावा घेत आहेत महापालिका आयुक्तांनी कळवा विभागाचा अचानक दौरा करून नालेसफाई बाबत असलेली घनकचरा विभागाची उदासीनता लक्षात घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी कळवेकर नागरिकांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणे शहरातील नाल्यांची साफसफाई दर महिन्यात करावी अशी सूचना प्रशसानाला केली होती, वर्षात एकदाच नालेसफाई होत असल्याने पावसाळा सूरू होण्यापूर्वी करण्यात येणार्‍या नालेसफाई मुळे नालेसफाई योग्य प्रमाणात होत नाही त्याचप्रमाने दर महिन्यात साफसफाई केल्या मुळे शहरातील नाले स्वच्छ राहिल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असा कयास होता परंतु प्रशासनाने व ठेकेदाराने आयुक्तांच्या सूचना कडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.दरम्यान नाले सफाईचा ठेका संपल्याने ठेकेदाराने नाला सफाई केला नसल्याचे बोलले जाते.

नाले सफाईचा ठेकेदाराला दिलेले वर्षभराचे कंत्राट संपले असून नवा ठेकेदार नेमलेला नाही,प्रशासनाच्या वतीने येत्या दोन ते तीन दिवसांत हा नाला साफ केला जाणार आहे
– मयुरी अंबाजी, उपमुख्य स्वच्छता अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग कळवा प्रभाग समिती

आमची मुले शाळेत येताना या नाल्याच्या दुर्गंधीचा त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याची दखल घेऊन नाला सफाई करण्यात यावा
– आशा विश्वकर्मा, पालक

First Published on: January 24, 2023 10:38 PM
Exit mobile version