सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे गरजेचे

सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे गरजेचे

Cyber

वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने महाराष्ट्र पोलिसांचे महाराष्ट्र सायबर सज्ज असून सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी केले.

महाराष्ट्र सायबरच्या वतीने राज्यातील सायबर सेलच्या नोडल अधिकारी/ कर्मचार्‍यांसाठी महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळाच्या संबंधीच्या कार्यशाळेत सिंह बोलत होते. सध्या तिकीट बुकींगपासून ते जेवण मागविण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. या गुन्ह्यांना भौगोलिक मर्यादा नसल्यामुळे हे गुन्हे सोडविण्यात गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपासही अत्याधुनिक डिजिटल साधनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सायबरने राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस ठाणी तसेच सायबर प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. येथील कर्मचार्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व प्रयोगशाळेत गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर व इतर यंत्रणा पुरविली आहे, असेही सिंह म्हणाले.

सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळावर आतापर्यंत फक्त महिला व बालकासंबंधीच्या सायबर गुन्ह्यांची तक्रार घेण्यात येत होती. मात्र, पुढील काळात सर्वच सायबर गुन्ह्यांची तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) संकेतस्थळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सायबर पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार्‍या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

महिला व बालकासंबंधीच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर प्राप्त होणार्‍या तक्रारींची दखल घेण्यात येते. यामध्ये बलात्कार, सामूहिक बलात्कार व चाईल्ड पोर्नोग्राफी याविषयीच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते. चोवीस तासाच्या आत या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविली जातात. त्यानंतर त्यावर संबंधित पोलीस ठाणे हे चोवीस तासात कार्यवाही करतात. चाईल्ड पोर्नोग्राफी व महिलांविषयक सायबर तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक १५५२६० देण्यात आला असून त्यावर नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत.

First Published on: July 22, 2019 4:57 AM
Exit mobile version