ट्रान्सहार्बर मार्गावर पहिली एसी लोकल

ट्रान्सहार्बर मार्गावर पहिली एसी लोकल

AC local

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचे आदेश रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत मध्य रेल्वेला दिले आहे. त्यामुळे ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरु होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र मध्य रेल्वेच्या कोणत्या मार्गावर एसी लोकल धावणार हा प्रश्न अनुउत्तरीत होता. मात्र गोयल यांनी मध्य रेल्वेवरील ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकल सुरु करण्याचे निर्देश दिल्यामुळे आता पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. ट्रान्स हार्बरने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे. तसेच या मार्गावर औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून या मार्गावर दररोज सुमारे 4 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे याच मार्गावर पहिली एसी लोकल चालविण्याचे नियोजन केले जात आहे. रेल्वे मंत्र्यांनी या मार्गावर 4 ते 5 एसी लोकल चालविण्यास रेल्वे प्रशासनाला सांगितले आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर बारा लोकल गाड्या असून यातील एक लोकल गाडी काढून त्याऐवजी एसी लोकलचा समावेश करा, असे अधिकार्‍यांना सांगितले आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर धावणार्‍या 11 लोकलमध्ये प्रत्येकी एक संपूर्ण प्रथम श्रेणीचा डबा काढून त्याऐवजी द्वितीय श्रेणीचा डबा जोडण्याच्या सूचना देण्यात आले आहे. प्रथम श्रेणीच्या प्रवाशांना एसी लोकलचा पर्याय मिळाल्यानंतर सामान्य लोकलमधून प्रवास करणार्‍या द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांना एक अतिरिक्त कोच मिळणार असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण एसी लोकल
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेला मिळणार्‍या १२ एसी लोकलपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी ६गाड्या देण्यात येणार आहेत. आतापर्यंत १२ पैकी ३ एसी लोकल पश्चिम रेल्वेला मिळाल्या. त्यामुळे मुंबईत दाखल झालेली चौथी लोकल ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे.

उंची जास्त असल्यामुळे एसी लोकल ट्रान्सहार्बरवर
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावर चालविण्याच्या चर्चा होत्या. परंतु या लोकलची उंची जास्त असल्यामुळे ही लोकल हार्बर मार्गावर धावणे शक्य नाही. मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल चालविण्यासाठी तिची उंची 4.270 मीटर इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे. परंतु हार्बर मार्गावरील आणि मुख्य मार्गावरील ब्रिटीश कालीन पुलांची उंची कमी असल्यामुळे या पुलांखालून वातानुकूलित लोकल जाऊ शकत नाही. त्यामुळे ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकल चालविण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

First Published on: September 5, 2019 5:24 AM
Exit mobile version