सावधान: कोलगेट, सेन्सोडाईनच्या नावावर होतेय ग्राहकांची फसवणूक

सावधान: कोलगेट, सेन्सोडाईनच्या नावावर होतेय ग्राहकांची फसवणूक

कोलगेटच्या नावे लोकांची फसवणूक

टीव्हीवर दाखवणाऱ्या अनेक जाहिरातींवर आपण विश्वास ठेवतो आणि प्रोडक्ट खरेदी ही करतो. पण, आता डॉक्टरांनी मान्यता दिलेली, क्लिनिकली प्रुवन असलेल्या टुथपेस्टच्या जाहिरातीतून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नामांकित कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल साडेचार कोटी रुपयांचा साठा जप्त केला गेला आहे.

नामांकित कंपन्यांकडून जाहिरातबाजी

टुथपेस्टची खरेदी वाढावी यासाठी खोट्या जाहिरातींतून जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या प्रयत्नशील आहेत, अशी तक्रारच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली. कोलगेट आणि सेन्सोडाईन या दोन मोठ्या ब्रँडची फसवी जाहिरात केली जात होती. ठाण्यातील एफडीएच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली असता, काही नामांकित कंपन्या अशी जाहिरातबाजी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यानुसार संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली.

कंपन्यांविरोधात कारवाई करत साठा केला जप्त

याविषयी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितलं की, ‘‘ चुकीच्या पद्धतीने जाहिरातबाजी करणाऱ्या कोलगेट आणि सेन्सोडाईन या नामांकित कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सेन्सोडाईन टुथपेस्टचा ४ कोटी २७ लाख ४४ हजार ७६२ रुपयांचा तर कोलगेटचा ४१ लाख ८६ हजार ००६ रुपयांचा साठा एफडीएने जप्त केला आहे. ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. कोलगेट आणि सेन्सोडाईनच्या निर्मात्या कंपन्या मे. कोलगेट पामोलिव्ह इंडिया आणि मे. ग्लॅक्सो स्मिथलाईन कंझ्युमर हेल्थ लि. या कंपन्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. ”

‘‘ कुठल्याही टुथपेस्ट कंपन्यांना विक्रीसाठी कॉस्मेटिक म्हणजेच सौंदर्यप्रसाधनांचा परवाना दिला जातो. याद्वारे कंपन्यांना वस्तूंच्या विक्रीचा अधिकार असतो. पण, काही कंपन्या विक्री वाढण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले, क्लिनिकली प्रुवन, दातांच्या सुरक्षेसाठी अशी जाहिरातबाजी करत असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ’’ – डॉ. पल्लवी दराडे ,आयुक्त ,अन्न आणि औषध प्रशासन

First Published on: April 4, 2019 9:08 PM
Exit mobile version