जे.जे. हॉस्पिटलमध्ये आता बहिरेपणावर उपचार; अत्याधुनिक श्रवणतंत्र विभाग सुरू

जे.जे. हॉस्पिटलमध्ये आता बहिरेपणावर उपचार; अत्याधुनिक श्रवणतंत्र विभाग सुरू

जे.जे. हॉस्पिटल

सर जे.जे हॉस्पिटलमध्ये आता बहिरेपणावर उपचार घेणं शक्य होणार आहे. कारण, हॉस्पिटलमधील कान, नाक, घसा विभागात अद्ययावत श्रवणतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. ऐकण्याची (बहिरेपणा) समस्या असलेल्या सर्व रुग्णांना ह्या विभागात सर्व आधुनिक प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या आधारे निदान आणि उपचार केले जातील, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली आहे.

हॉस्पिटलच्या अधिष्ठातांच्या हस्ते उद्घाटन

ह्या विभागात असलेल्या विविध मशिन्सच्या आधारे रुग्णाचे निदान आणि उपचार हे अतिशय अचूक तसंच जलदगतीने होतील अशी माहितीसुद्धा देण्यात आली आहे. नुकतंच या विभागाचं उद्घाटन हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आलं.

बाळांच्या श्रवणदोषावरही उपचार

तसंच, नवजात बालकांसाठी ‘श्रवणदोष पडताळणी प्रक्रिया’ ह्या राष्ट्रीय अभियानाचे देखील उद्घाटन करण्यात आले. ज्यात कोणत्याही नवजात बालकास जर कोणत्या प्रकारचा श्रवणदोष असेल तर तो तात्काळ डॉक्टरांच्या लक्षात येऊन त्यावर लवकरात लवकर उपचार करता येईल. ज्यामुळे भविष्यात अशा बालकास बहिरेपणा सारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

सर जे. जे हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. अशा वेळी कोणत्याही रुग्णास अद्ययावत आणि उत्कृष्ट सेवा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जे.जे. हॉस्पिटल हे नेहमी प्रयत्नशील आणि अग्रेसर असते.
डॉ. पल्लवी सापळे, सर जे. जे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता

हेही वाचा – लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू 

First Published on: December 16, 2019 8:41 PM
Exit mobile version