सर्वोच्च न्यायालयाचा निकाल…; शिवसेना भवनातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय ठरले?

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल…; शिवसेना भवनातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय ठरले?

Ambadas Danve

मुंबई : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची बैठक होत असल्यामुळे या बैठकीकडे राज्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. निकालनंतर प्रथमच सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलवण्यात आले. यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते. शिवसेना ठाकेर गटप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्त्वाीच बैठक आज (17 मे) पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे सर्वाच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे ठळक मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी निर्णयांची माहिती माध्यमांना दिली.

अंबादास दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रत्रेसंदर्भात निकाल लागलेला होता. या निकालाची तांत्रिकदृष्ट्या पूर्ण माहिती जशी आमदारांना दोन-तीन दिवसांपूर्वी दिली गेली, तीच माहिती आज शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संघटिकांना देण्यात आली. कारण निकाल लागलेला असताना बरेचजण विरोधात निकाल लागलेला असतानाही पेढे वाटत आहेत आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बैठकीमध्ये जमलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना संपर्कप्रमुखांना सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन त्यातील महत्त्वाचे ठळक मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

निकालातील सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी
सत्तासंघर्षाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे वास्तव तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निकालाची प्रत आणि त्यातील ठळक मुद्दे जिल्हाप्रमुखांना समजून सांगितले असून त्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांना समजवून सांगायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागला असून सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे देण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हा प्रमुखांच्या शंकांचे निरसन आणि प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. याशिवाय आगामी निवडणुकांबाबत काहीच चर्चा झाली नसल्याचेही अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मेळावा आणि वर्धापन दिन आनंदोत्सवात होणार साजरा
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पुढील महिन्यात 18 जून रोजी मुंबईत भव्य मेळावा होणार आहे आणि यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी (19 जून) होणारा शिवसेनेचा वर्धापन दिन आनंदोत्सवात साजरा होणार आहे.

 

First Published on: May 17, 2023 4:29 PM
Exit mobile version