विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात

Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील दहा गावांपैकी दोन गावांतील 300 नागरिकांचे स्थलांतर शिल्लक राहिले असून, हे स्थलांतर या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे वर्मा यांची नुकतीच बदली झाल्याने या कामाची गती मंदावली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण 2268 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील 1061 हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. त्यामुळे सिडकोने गेल्या वर्षी या जमिनीवर बांधकाम सुरू केले आहे. उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम 80 टक्के झाले आहे. याच ठिकाणी उलवा नदीचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू असून, ते पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. सिडकोने या भागात दोन हजार कोटींची कामे सुरू केली आहेत. विमानतळ उभारणार्‍या जीव्हीके कंपनीला दहा गावांखालील 671 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनलचा विकास आराखडा ही कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे त्यांना सर्व जमीन मोकळी करून हवी आहे. सिडकोने दहा गावांपैकी आठ गावे प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिकामी केली आहेत. प्रत्येक गावात तेथील शाळा आणि धार्मिक स्थळांचे प्रश्न प्रलंबित होते, ते सोडवण्याचा प्रयत्न केला गेला असून, आता कोंबड भुजे आणि उलवा येथील सार्वजनिक प्रश्न प्रलंबित आहेत. सिडकोने 2886 पैकी केवळ आता 300 प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर करणे बाकी राहिले आहे. प्रकल्पग्रस्तांनी लवकर स्थलांतर करावे यासाठी सिडकोने प्रति चौरस फूट 500 रुपये प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर प्रमाण वाढले आहे. गावातील मंदिरासाठी सिडकोने भूखंड आणि बांधकामासाठी एक कोटी रुपये देऊ केले आहेत.

सिडकोच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका लवंगारे वर्मा यांनी गावे लवकर स्थलांतरित व्हावी यासाठी गावाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये एक विश्वास निर्माण होऊन ते स्थलांतराला प्रतिसाद देत होते. सुमारे तीन हजार प्रकल्पग्रस्तांपैकी आता केवळ 300 प्रकल्पग्रस्त गाव सोडून जाण्यात शिल्लक आहेत. ते येत्या काही दिवसांत घर निष्कासित करून गाव सोडतील, असा सिडकोला विश्वास आहे.

उर्वरित ग्रामस्थही लवकरच निरोप घेणार
गेले अनेक वर्षे राहिलेले गाव सोडताना ग्रामस्थांना दु:ख अनावर होत आहे. मात्र, देशाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांवर तुळशीपत्रे ठेवली आहेत. सिडकोने ग्रामस्थांना मोबदला चांगला दिला, पण त्याचे मोल गावाच्या बदल्यात चुकवावे लागत आहे. आता केवळ 300 ग्रामस्थ राहिले आहेत, तेही गावाच्या काही समस्या मार्गी लावाव्यात म्हणून थांबले आहेत. त्या येत्या काही दिवसांत सिडको मार्गी लावणार आहे. इतर गावांतील ग्रामस्थ गाव सोडून गेल्याने आता शिल्लक असलेल्या ग्रामस्थांचे मन गावात रमेनासे झाले आहे. त्यामुळे मोठ्या जड अंत:करणाने हे ग्रामस्थ गावांचा लवकरच निरोप घेणार आहेत.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोंबड भुजे व उलवा तीळ केवळ 300 प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आता शिल्लक असून, त्यांच्या काही मागण्या मार्गी लागल्या की ते स्थलांतर होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला गती येण्याची शक्यता आहे.
– अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

First Published on: March 18, 2019 4:57 AM
Exit mobile version