घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून ५३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या

घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून ५३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या

फाईल फोटो

क्षुल्लक वादातून एका ५३ वर्षांच्या व्यक्तीची दोघांनी लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर परिसरात घडली आहे. बशीर नबाव खान, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे.

नेमके काय घडले?

घाटकोपर येथील गावदेवी रोडवरील मुनार मशिदीजवळील संघानी इस्टेट परिसरात मुज्जमिल खान हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत आहे. मुज्जमिल खान याचे त्या परिसरात राहणाऱ्या दोघांसोबत क्षुल्लक कारणांवरुन वाद झाला. या वादानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात या दोघांनी मुज्जमिलला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणारे मुज्जमिल खान यांचे वडिल बशीर यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बशीर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मुज्जमिलच्या तक्रारीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला असून या गुन्ह्यात फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – संसाराला कंटाळून त्याने केली आत्महत्या; सात बायकांनी केला पत्नी असल्याचा दावा


First Published on: October 7, 2019 10:17 PM
Exit mobile version