लग्नानंतर महिनाभरातच विभक्त होण्याचे प्रमाण वाढतंय!

लग्नानंतर महिनाभरातच विभक्त होण्याचे प्रमाण वाढतंय!

Divorce

लग्न सोहोळ्यात ‘सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका’ घेणार्‍या आजच्या पिढीसाठी स्वत:चे लग्न टिकवणे म्हणजे एक आव्हान ठरत आहे. अनेक जोडपी लग्नानंतरच्या फक्त १५- २० दिवसांच्या संसारानंतर विभक्त होत आहेत. लग्न-हनीमूननंतर एका महिन्याच्या आतच विभक्त होणार्‍या जोडप्यांची संख्या सतत वाढत आहे. त्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लैंगिक वर्तनावरून जोडीदाराला ‘जज’ करण्याबाबत मत बनविण्यात घाई करणे, हे आहे.

मॅरेज कोच म्हणून जोडप्यांना समुपदेशन करणार्‍या लीना परांजपे यांनी या नव्या ट्रेण्डबाबत माहिती दिली. लीना परांजपे म्हणाल्या, इंटरनेट, मोबाईलच्या आजच्या काळात रोमँटिक-सेन्शुअल-पॉर्न असा बहुविध कंटेंट सर्वांनाच उपलब्ध झाला आहे. त्यातून ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार, आवडी-निवडीनुसार प्रत्येकाच्या लैंगिक प्रेरणा, लैंगिक वर्तन प्रभावित होत आहे. लग्न-हनीमूनच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार्‍या आनंदाच्या लाटांसोबत नातेसंबंधांची जी आव्हाने येतात, ती कशी हाताळायची हे माहित नसल्यामुळे नवी जोडपी गोंधळत आहेत. मनमोकळ्या संवादाच्या अभावामुळे त्यांची मानसिक घालमेल होते आणि मग विभक्त होण्याचा अत्यंत कठोर निर्णय ते घेतात.

लैंगिक वर्तन ही एक अत्यंत खासगी, नाजूक, संवेदनशील बाब असली तरी तिच्या पलिकडेही भावभावनांचे- सुख-दु:खाचे- कौटुंबिक नातेसंबंधाचे- जबाबदारीचे एक खूप मोठे जीवन आहे. त्या जीवनाचे आव्हान एक जोडपं म्हणून एकत्रितपणे पेलायचे असेल तर नवरा-बायकोंमध्ये सर्वात आधी भावनिक जवळीक निर्माण व्हायला हवी. ही भावनिक जवळीक लग्नाच्या आधीही एकमेकांशी संवाद साधून निर्माण होऊ शकते. खरंतर, तशी भावनिक जवळीक – भावनिक मोकळेपणा निर्माण झाल्याशिवाय लग्न- हनीमून करणे हेच मुळी आजच्या ‘खुल्या समाजव्यवस्थे’त चुकीचे आहे”, असे मत लीना परांजपे यांनी व्यक्त केले.

First Published on: August 27, 2019 2:31 AM
Exit mobile version