राज्य सरकारने कोविडसाठी महापालिकांना मदत केली नाही- फडणवीसांचा हल्लाबोल

राज्य सरकारने कोविडसाठी महापालिकांना मदत केली नाही- फडणवीसांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते फडणवीसांचा आरोप

राज्य सरकारने कोविडसाठी महापालिकांना एका नव्या पैशाची मदत केली नाही, अशी टीका राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेलमध्ये केली. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिकेला भेट दिली. पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोविडसाठी केल्या जाणाऱ्या आरोग्यव्यवस्थेची माहिती घेतली.

यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात सरकारच्या नियंत्रणात असल्यातरी महापालिकांवर मोठा बोझ्या आहे. ज्या मोठ्या महापालिका आहेत त्या हा बोझ्या झेलत आहेत, मात्र, लहान महापालिकांची मोठी अडचण होत आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांच्यात समन्वय राखून कोविडविषयी नियोजन झाले पाहिजे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

लॉकडाऊनच्या चार महिन्याच्या कालावधीनंतर नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडावे लागत आहे, आर्थिक व्यवहार महत्वाचे आहेत, आर्थिक संकट येत आहे, त्यामुळे सरकारने यापुढे धोरण निश्चित करायला हवे, असे देखील फडणवीस म्हणाले. सध्या अनलॉक सुरू असताना दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन सुरू केला आहे. मात्र, त्यात दोन किलोमीटरच्या परिघाची अट प्रत्यक्षात शक्य नाही. दोन किलोमीटरची अट रद्द केली हे योग्य केल्याचे फडणवीस म्हणाले.  ९० टक्के नागरिकांना कोरोनाचा धोका कळलेला. त्यामुळे आवश्यक असेल तरच ते बाहेर पडतायत. पोलीस देखील चार महिने दिवसरात्र कर्तव्य बजावून थकलेत, असे सांगत नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, खबरदारी, यंत्रणेवर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

व्हेंटिलेटर सुविधा वाढविण्याची गरज!

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. रायगड जिल्ह्यातील जनतेला पनवेल उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा वाढविण्याची गरज असून व्हेंटिलेटर वाढविण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. देशातील संसर्गाचा दर ६.४ टक्के आहे,मात्र पनवेलमधील संसर्गाचा दर ४५ टक्के आहे. सदर परिस्थिती गंभीर असून सर्वच महापालिका क्षेत्रात टेस्टिंग आणि उपचाराची सुविधा वाढवली पाहिजे, अलगीकरण आणि कोविड हॉस्पिटलची यंत्रणा वाढविणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पंकजा मुडेंचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कट

First Published on: July 4, 2020 12:22 PM
Exit mobile version