…अन्यथा मुंबई बंद करू!; धारावी पुनर्विकास समितीचा इशारा

…अन्यथा मुंबई बंद करू!; धारावी पुनर्विकास समितीचा इशारा

धारावी पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरु होत नसल्याने धारावीकरणाचे विकासाचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने प्रकल्पाचे काम त्वरित सुरु न केल्यास मुंबई बंद करू, असा इशारा धारावी पुनर्विकास समितीने दिला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत धारावी पुनर्विकास समितीने शासकीय विश्रामगृह वांद्रे येथे पत्रकार परिषद आज आयोजित केली होती. या परिषदेत समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी हा इशारा दिला. धारावी प्रकल्पाची किंमत २००४ मध्ये ५६०० कोटी ठरविण्यात आली होती. आजमितीला ही किंमत २७,००० कोटींवर पोहोचली आहे. प्रकल्पाकरता अनेकदा जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्यांनतरही १५ वर्षांपासून अधिक काम हा प्रकल्प रखडला आहे. सरकार धारावीकरांना विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवत आले आहे. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपनीस सरकारने डिफेक्ट पत्र देणे आवश्यक होते. परंतू अद्यापपर्यंत यशस्वी निविदाकाराला देकारपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे कोरडे यांनी सांगितले.

शासनाच्या अशा धोरण लकव्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प वारंवार रखडत आहे. त्यामुळे शासनानेच त्वरित मास्टर प्लॅन जाहीर करून स्व:निधीतून हा प्रकल्प तडीस न्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार असून या भेटीतून सकारात्मक तोडगा न निघाल्यास धारावीकरांना तीव्र आंदोलन करावे लागणार आहे. धारावीजवळून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे आणि मुंबईत येणारे मुख्य महामार्ग आहेत. हे मार्ग रोखून मुंबई बंद करू, असा इशाराही समितीने यावेळी दिला.

हेही वाचा –

विरोधकांना जेलमध्ये टाकलं नाही, ही सरकारची चूकच – प्रशांत बंब

जाताना तरी हा भ्रष्टाचाराचा डाग धुवून टाका; एकनाथ खडसेंचे भावनिक भाषण!

First Published on: July 2, 2019 9:13 PM
Exit mobile version