मुंबइकरांनो काळजी घ्या, लेप्टोचा तिसरा बळी

मुंबइकरांनो काळजी घ्या, लेप्टोचा तिसरा बळी

पालिकेला हवाय 'नाईट किलर'महापालिकेची पावसाळ्यासाठी पूर्वतयारी

सध्या लेप्टोस्पायरोसिसचा या आजारामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे तिघांचा जीव गेला आहे. तर जून महिन्यात लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. लेप्टोस्पायरोसिससोबत जून महिन्यात गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. जून महिन्यात गॅस्ट्रोचे ७७९ आणि मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले आहेत.

गेल्यावर्षी आढळले लेप्टोचे २० रुग्ण

गेल्यावर्षी ३० जून २०१७ पर्यंत लेप्टोचे एकूण २० रुग्ण आढळले होते. पण, एकाचाही मृत्यू झाला नव्हता. पण , यावर्षी एका आठवड्यात ३ रुग्णांना लेप्टोमुळे जीव गमवावा लागला आहे. २६ जूनला कुर्ल्याच्या १५ वर्षीय मुलाचा बळी गेला. त्यानंतर गोवंडीतील २८ वर्षीय युवकाचा शीव रूग्णालयात मृत्यू झाला. तर, २७ जूनला मालाडच्या २१ तरुणीला लेप्टोमुळे जीव गमवावा लागला आहे. म्हणजेच या एका आठवड्यात तिघांना लेप्टो मुळे जीव गमवावा लागला आहे.

गॅस्ट्रो, मलेरियाच्या रुग्णांतही वाढ

आतापर्यंत गॅस्ट्रोचे ७७९ आणि मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गॅस्ट्रोचे ८८६ आणि मलेरियाचे ४४२ रुग्ण होते. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर काविळीच्या रुग्णांची संख्या ९४ वर पोहोचली आहे.

डेंग्यूचे २१ रुग्ण १ मृत्यू

जूनपर्यंत डेंग्यूचे तसंच डेंग्यूसदृश्य आजारांचे एकूण २९७ रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. पण, यामध्ये केवळ २१ रुग्ण हे डेंग्यूचे होते. आतापर्यंत जूनमध्ये साथीच्या आजारांनी ४ रुग्णांचे बळी घेतले असून त्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचे ३ तर एक डेंग्यूच्या आजारांच्या रुग्णाचा समावेश आहे. पण, डेंग्यूचा बळी गेलेला रुग्ण हा उत्तर प्रदेशमधून आला होता, असंही सांगितलं आहे.

रहिवाशांची आरोग्य तपासणी

लेप्टोच्या या घटनांनंतर कुर्ला, गोवंडी आणि मालाड परिसरातील एकूण १ हजार ९५६ कुटुंबांची पाहणी करून एकूण ८ हजार ०२९ रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तापाचे दहा रुग्ण, ७ रुग्ण यूआरटीआयचे तर ४ रुग्ण अतिसाराचे आढळून आले.

First Published on: June 30, 2018 9:32 PM
Exit mobile version