हेच ते ‘तीन दबंग अधिकारी’ ज्यांनी केला क्रूझ रेव्ह पार्टीचा पर्दाफाश

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)शनिवारी मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. यात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठजणांना अटक करण्यात आली असून. न्यायालयाने त्यांना ७ ऑक्टोबर पर्यंत एनसीबीची कोठडी दिली आहे. आर्यनमुळे या प्रकरणाला हायप्रोफाईल वलय मिळाले असून ज्या तीन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

समीर वानखेडे- यातील बेधडक, कडक शिस्तीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच नाव लवकरच एखाद्या रेकॉर्ड बुकमध्ये जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून वानखेडे या ड्रग्ज माफियांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणीही वानखेडे यांनी कुख्यात माफिया दाऊद इब्राहीम याच्या गँगमधील अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सारा खान, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी वानखेडे यांनीच केली होती. आर्यन खान व त्याच्याशी संबंधित व्यक्तींचीही ते चौकशी करत आहेत. एनसीबीच्या आधी वानखेडे रेवन्यू विभागात कार्यरत होते. त्यांचे वडिलही मुंबई पोलिसात आहेत.

आशिष राजन प्रसाद- क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये दुसरे नाव येते ते इंटलिजंस ऑफिसर असलेले आशिष राजन प्रसाद यांचे. २ ऑक्टोबरला क्रूझवर आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवेळी आशिष प्रसादही तेथे उपस्थित होते. त्यांनीच स्वता: ड्रग्जचा साठा जप्त केला. ते सीआयएसएफ विभागात स्पेशल इंटेलिजन्स युनिट मध्ये कार्यरत होते. इंटेलिजन्स कलेक्शनमध्ये त्यांनी प्रावीण्यही मिळवलं आहे.

विश्व विजय सिंह- मूळचे लखनौमधील असणारे विश्व विजय सिंह हे मुंबई एनसीबीचे सुपरिटेंड आहेत. ज्यांनी आर्यनला ताब्यात घेतलं. तसेच सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीलाही सिंह यांनी अटक केली होती. रियाचा भाऊ शौविक आणि अर्जुन रामपाल यांचीही चौकशी त्यांनी केली होती. ते गेली १० वर्ष एनसीबीमध्ये काम करत आहेत. २०१८ सालीही त्यांनी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. एनसीबीच्या खास मोहिमांना अंतिम स्वरुप देण्यासाठी सिंह यांना गौरवण्यात आले होते.

First Published on: October 4, 2021 8:06 PM
Exit mobile version