गर्दी टाळण्याकरता गणेश विसर्जनासाठी मिळणार ऑनलाईन टाईमस्लॉट

गर्दी टाळण्याकरता गणेश विसर्जनासाठी मिळणार ऑनलाईन टाईमस्लॉट

भिवंडीत ६ हजार गणपती बाप्पांचे विसर्जन

संपूर्ण राज्यामध्ये पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्शपाठ घालून देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डीजी ठाणे प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करुन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यापूर्वीच महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात श्रींची मूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणालीद्वारे ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात येत आहे.
विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही १३ ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती आणि एकूण २० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देऊन व भाविकांच्या सोयीसाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आता डीजी ठाणे कोव्हिड-१९ डॅशबोर्डच्या संकेतस्थळावर विसर्जनाची टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२० पासून ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डीजी ठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडून आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहान महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान, हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रांमधील गणपती मूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर विसर्जनास परवानगी देण्यात येणार नसून नागरिकांनी घरच्या घरीच श्रीच्या मुर्तीचे विसर्जन करून कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवामध्ये कोरोनाची संसर्ग होणार नाही, यासाठी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा –

रशियाच्या कोरोना लसीचं सत्य उघड
First Published on: August 12, 2020 6:35 PM
Exit mobile version