मुंबईत नाईटलाईफ सुरू! २४ तास हॉटेल, मॉल सुरू राहणार!

मुंबईत नाईटलाईफ सुरू! २४ तास हॉटेल, मॉल सुरू राहणार!

विद्यमान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे शिवसेना-भाजपचं सरकार असतानापासून मुंबईतल्या नाईटलाईफबद्दल पुढाकार घेताना दिसून आले होते. वारंवार हा मुद्दा त्यांनी मांडला होता. मात्र, त्यावर ठोस असा निर्णय तेव्हा होऊ शकला नव्हता. अखेर त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता ज्या व्यावसायिकांची इच्छा आहे, अशांना २४ तास हॉटेल आणि मॉल सुरू ठेवता येणार आहेत. सध्या जरी या निर्णयाला तत्वत: मंजुरी दिली गेली असली, तरी स्वत: आदित्य ठाकरेच पर्यटन मंत्री असल्यामुळे हा निर्णय पुढे कायम होण्याचीच शक्यता अधिक आहे. यासंदर्भात गुरुवारी आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतली होती. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत नाईटलाईफ दिसणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या बैठकीत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईतील हॉटेल्स मालक, पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांसोबत बैठक झाली. मॉल, मिल कंपाऊंड अशा आसपास रहिवासी भाग नसलेल्या ठिकाणी हॉटेल, थिएटर, दुकानांना २४ तास व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. २६ तारखेपासून याची ट्रायल रन सुरू होईल. याचं बंधन नसेल, परवानगी देण्यात आली आहे. २०१७मध्ये याचा कायदा पारित करण्यात आला होता. त्याचं फक्त नोटिफिकेशन जारी करायचं होतं. ते आपण केलं आहे. सध्या सेवा क्षेत्रामध्ये ५ लाख रोजगार आहेत. नाईट लाईफ सुरू झाली, तर किमान १० लाख लोकांना नोकऱ्या मिळू शकतील. राज्य सरकारचा महसूल देखील त्यामुळे वाढेल. मॉल, मिल कंपाऊंड, नरीमन पॉइंट, काला घोडा आणि बीकेसी या भागामध्ये ही परवानगी असेल.

आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री

दरम्यान, नाईट लाईफला परवानगी देण्यात आली असली तरी मद्यपानला परवानगी देण्यात आलेली नाही.

या निर्णयानुसार रहिवासी वसाहत नसलेल्या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. २४ तास हॉटेल्स आणि मॉल्स सुरु ठेवण्यासाठी सेवांचे नियमन, अटी तयार करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. वरळीतील अ‍ॅट्रिया मॅाल, घाटकोपरमधील आरसीटी मॅाल, गोरेगावमधील ऑबेरॉय मॉल, फिनिक्स आदी २५ मॅाल्समध्ये नाईटलाईफसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील अनेक दुकाने, रेस्टॅारन्ट आदी आस्थापने २४ तास उघडी ठेवता येणार आहेत.

मुंबईला पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने झालेल्या हा निर्णय स्वागतार्ह आहे. नाईट लाईफसाठी कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे लागेल. त्याला थोडा वेळ लागेल.

गुरबीर सिंग, अध्यक्ष, हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॅारन्ट असोसिएशन

विरोधकांचा तीव्र आक्षेप!

दरम्यान, या निर्णयाला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. ‘राज्य सरकार जर निवासी भागातील हाँटेल, पब सुरु ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल’, असं भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘मुंबईत हॉटेल, बार, पब २४×७ सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल, पब २४×७ सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल, तर आमचा त्याला कडाडून विरोध राहील. कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांची सुरक्षितता याचा विचार होणे अपेक्षित असून या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार असून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत’.

First Published on: January 17, 2020 8:58 PM
Exit mobile version