मुंबई – पश्चिम रेल्वे विस्कळीत; बोर्डीजवळ पुलाचे गर्डर झुकले

मुंबई – पश्चिम रेल्वे विस्कळीत; बोर्डीजवळ पुलाचे गर्डर झुकले

पश्चिम रेल्वे

भारताच्या पूर्वमध्य आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. या वाऱ्याचा फटका रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पालघरमधील रेल्वे स्थानकावर गर्डर कोसळल्याची घटना घडली आहे. गर्डर कोसळ्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बोर्डी या रेल्वे स्थानकावर पाच गर्डर कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक वळवली

बोर्डी रेल्वे स्थानकात पुलांचे खांब झुकले असल्यामुळे विरार ते डहाणू या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांची देखील वाहतूक वळवण्यात आली आहे. याचा फटका रेल्वे प्रवाशांना होत आहे. तसेच पालघर वरुन येणाऱ्या गाड्या देखील थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेने या वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बैठक घेतली. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवली जाणार आहे. किनारपट्टीलगतच्या भागांमधील रेल्वेच्या विभागीय मंडळांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गांधीधाम, भावनगर पारा, पोरबंदर, वेरावल, ओखा या भागांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या वादळाचा फटका बसणाऱ्या भागांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.

मध्य रेल्वेचे प्रवासी त्रस्त

गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे वाहतूकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी ऐन गर्दीच्यावेळी कामाला निघालेल्या नोकरदारवर्गात संतापाचे वातावरण दिसत आहे. कारण आज सकाळी परत एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण दिशेकडून मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक नेहमीप्रमाणे १५ ते २० मिनिटे उशिराने धिम्या गतीने सुरू होती. तसेच १३ जून रोजी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकण आणि गोव्यातील काही भागात देखील वादळासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यांकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – चर्चगेट स्टेशनवर होर्डिंग कोसळून वृद्धाचा मृत्यू


 

First Published on: June 12, 2019 4:19 PM
Exit mobile version