तृतीयपंथियावर करत होता प्रेम; पण संशयातून केला खून

तृतीयपंथियावर करत होता प्रेम; पण संशयातून केला खून

प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने कल्याण शहरात खळबळ उडाली. धीरज विवेक साळवे उर्फ रेवा देसाई असे मृत तृतियपंथीयाचे नाव आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सुशील भालेराव या तरूणाविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली. सुशीलचे रेवावर प्रेम होते, मात्र संशयातून त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.

काटेमानवली परिसरातील आंबेडकर चौक येथील शिवसह्याद्री कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणारा धीरज साळवी उर्फ रेवा देसाई हा तृतीयपंथीय असून त्याच्यावर सुशील भालेराव या तरुणाचे प्रेम होते. मात्र सुशील त्याच्यावर नेहेमी संशय घेत असे. त्यातून तो रेवा याला मारहाण करीत असे. तीन दिवसांपासून रेवा याच्या घराच्या दाराला कुलूप होते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा उघडा होता. घरात काहीच हालचाल न दिसल्याने घरमालकीणीची मुलगी भाग्यश्री हंजनकर हिने रेवाला बाहेरून आवाज दिला. त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरात डोकावून पाहिले असता तिला रेवा हा बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तिने तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असता रेवाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता महापालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविला. धारदार शस्त्राने रेवा याच्या शरीरावर असंख्य वार करण्यात आले होते. मृतदेह कुजल्याने दोन दिवसांपूर्वी रेवाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रेवाच्या भावाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुशील भालेराव विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरु केला. अखेर मंगळवारी सकाळी पोलिसांनी सुशील याला अटक केली. बुधवारी त्याला कल्याण कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: May 22, 2019 12:57 PM
Exit mobile version