युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती

युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती

युटीएस अ‍ॅप

मध्य रेल्वेच्या युटीएस अ‍ॅपला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून युटीएस अ‍ॅपच्या युजर्सची संख्या 8 लाखांच्या घरात गेली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक युजर्सची संख्या असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. युटीएस अ‍ॅपच्या वाढत्या प्रतिसादामुळे आता तिकीट खिडक्यांवरील गर्दीसुद्धा कमी होताना दिसून येत आहे.

एप्रिल 2017 ला या युटीएस मोबाईल अ‍ॅपचे युजर्स एकूण 3 लाख 74 हजार होती. तर जून 2019 मध्ये युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या 6 लाख 23 हजार 308 इतकी होती. मात्र 19 ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या 8 लाख 23 हजार 200 इतकी झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी 2015 मध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले होते. हे अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम (सीआरआयएस) कडून तयार करण्यात आले होते. रेल्वेने हे अ‍ॅप मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहे.

ते अनारक्षित (अनरिझर्व्ह) तिकिटांसाठी आहे. मागील दोन वर्षात या अ‍ॅपकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यांनतर रेल्वे बोर्डाने मिशन मोडवर या अ‍ॅपची जनजागृती मोहीम हाती घेतली होती. त्याला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. रेल्वे मार्गावरील एकूण प्रवासी संख्येच्या 11.06 टक्के संख्या युटीएस अ‍ॅप युजर्सची आहे. यासह युटीएस अ‍ॅपद्वारे तिकिट काढल्यावर पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये युटीएस अ‍ॅपची पसंती वाढली असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

First Published on: August 21, 2019 5:44 AM
Exit mobile version