आदिवासींना पिण्यासाठी डबक्यातील पाणी

आदिवासींना पिण्यासाठी डबक्यातील पाणी

Shahapur

शहापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या दापुरमाळ या आदिवासी पाड्यातील लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. त्यापैकीच रणरणत्या उन्हात पाण्यासाठी जेरीस आणणारी पाणी समस्या ही दापुरमाळवासीयांच्या पाचवीला पुजली आहे. घोटभर पाण्यासाठी अक्षरश: अनवाणी पायाने जमीन तुडवावी लागत आहे. एवढे करूनही त्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर एखादा नाला किंवा डबके दिसले तर त्यातील चिखलाचे पाणी या आदिवासी बांधवांना प्यावे लागत आहे.

गावात रोजगार नसल्यामुळे शेकडो आदिवासी तरुण रोजगाराच्या शोधात वीटभट्ट्यांवर आणि बांधकामाच्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. अशा परिस्थितीतही काही कुटुंबे दापुरमाळ सारख्या दुर्गम पाड्यावर तग धरून आहेत. मात्र, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षापासून फारच गंभीर झाला असून रानमाळात पाणवठ्याचा शोध घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत आहे. या पाड्यात रस्ता तसेच विजेची सोय नाही. या समस्यांबरोबरच तेथील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. या वस्तीतील ग्रामस्थांना एका डबक्यातील चिखलमय पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या पाड्यातील पाण्याचे हे भीषण वास्तव कानी पडत असतानासुद्धा प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे स्थानिकांचे मत आहे. तहसीलदार, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इथली परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आश्वासनांची खैरात करुन निघून गेले. यात तत्कालीन तहसीलदार अविनाश कोष्टी व माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम बेंडकुळे यांनी अथक प्रयत्न करुन रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवली. प्रत्यक्षात प्रशासकीय स्तरावर कामाला देखील सुरुवात करण्यात आली. मात्र, वन विभागाचा कायदा आडवा आल्याने या कामाला स्थगिती देण्यात आली.

First Published on: April 22, 2019 4:59 AM
Exit mobile version