Cyclone Nisarga: मुंबईच्या ६ समुद्र किनारपट्टयांवर जीवरक्षकांसह जवानही तैनात

Cyclone Nisarga: मुंबईच्या ६ समुद्र किनारपट्टयांवर जीवरक्षकांसह जवानही तैनात

Cyclone Nisarga: मुंबईच्या ६ समुद्र किनारपट्टयांवर जीवरक्षकांसह जवानही तैनात

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बुधवारी कोणीही समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्यांवर जीवरक्षक, मुंबई अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू बोट, इतर सर्व बचावाच्या साहित्यांसह तैनात करण्यात आले आहे.

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या समुद्र किनारपट्टीवरील चौपाट्यांवर एकूण ९३ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या दहा केंद्रातील जवानांही याठिकाणी तैनात करण्यात येत आहेत. या चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात कुणी अडकल्यास तिथे बचावाचे कार्य करण्यासाठी जेट स्की, फायबर बोट, अँकरसह ३० ते ३५ मीटर लांब जाईल असे रोप, रेस्क्यू ट्युब बोट, बॅटरी, स्पाईन बोर्ड, रेस्क्यू बोर्ड, थ्रो बॅग्स, तरंगते स्टेचर्स आदींची साहित्य प्रत्येक चौपाटीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गिरगाव चौपाटी : १३ जीवरक्षक, ६ रेस्क्यू बोट, ऑक्सिजन १ सिलिंडर, रेस्क्यु रोप,

दादर चौपाटी : १४ जीवरक्षक, ५ रेस्क्यू बोट, ऑक्सिजन १ सिलिंडर, रेस्क्यु रोप,

जुहू चौपाटी : २० जीवरक्षक, १७ रेस्क्यू बोट, ऑक्सिजन १ सिलिंडर, रेस्क्यु रोप, २ मेगा फोन, ६ वॉकी टॉकी

आक्सा चौपाटी : १४ जीवरक्षक, ८ रेस्क्यू बोट, ऑक्सिजन १ सिलिंडर, रेस्क्यु रोप, ३ वॉकीटॉकी

वर्सोवा चौपाटी : १४ जीवरक्षक, ०४ रेस्क्यू बोट, , रेस्क्यु रोप, १ मेगा फोन,

गोरोई चौपाटी : १८ जीवरक्षक, ०५ रेस्क्यू बोट, ऑक्सिजन १ सिलिंडर, रेस्क्यु रोप, , ३ वॉकी टॉकी

होर्डींगवर लक्ष

मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात उंच होर्डींग लावण्यात आले आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे हे होर्डींग कोसळण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या होर्डींगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांनी काही होर्डींगची तपासणी केली असून मोठ्या होर्डींगच्या आसपास परिसरात नागरिकांनी उभी राहू नये तसेच वाहनेही उभी करू नये, असेही निर्देश त्यांनी दिली.

धोकादायक इमारती

मागील वर्षी ४९९ धोकादायक इमारती होत्या. त्यातील १४ तोडून टाकल्या होत्या आणि ७० रिकाम्या केल्या होत्या. परंतु अन्य इमारती या न्यायप्रविष्ठ आहेत. त्यातच यावर्षी कोरोनामुळे प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि अधिकारी व्यस्त असल्याने जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा सर्वे झालेला नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या काही इमारती आजही धोकादायक असल्याने या इमारतींना मोठा धोका मानला जात आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील अशा मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना तात्पुरती व्यवस्था शाळांमध्ये निश्चित करण्यात आली आहे.

मुंबईतील झाडांच्या ८० फांद्यांची छाटणी

मुंबईत मान्सूनच्या तयारीसाठी आतापर्यंत ८० टक्के झाडांच्या फांद्या तसेच मृत झाडे कापण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मोठ्या खोडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असून उर्वरीत २० टक्क्यांमध्ये छोट्या स्वरुपाच्या झाडांचा समावेश असल्याचे उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे किंवा झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यापार्श्वभूमीवर मुंबईतील झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच धोकादायक झाडे कापून टाकण्यात आल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 2, 2020 8:04 PM
Exit mobile version