लोकलच्या गर्दीचे आणखी दोन बळी; विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू

लोकलच्या गर्दीचे आणखी दोन बळी; विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू

रेल्वे

मध्य रेल्वे मार्गावरील कोपर आणि ठाकुर्ली स्थानकासमोर लोकलमधून पडून एका विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू झाल्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. जयेश विठ्ठल कुडव (वय १९) आणि संतोष किर्ती कोहली (वय २७) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. लोकलमधील वाढत्या गर्दीचे हे दोन्ही बळी ठरले आहेत. उल्हासनगर-३ येथील राधिका महलमध्ये राहणारा संतोष कोहली हा नवी मुंबईतील ऐरोली येथे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मंगळवारी उल्हासनगरला आईला भेटण्यासाठी गेला होता. तेथून तो बुधवारी सकाळी साडेआठची फास्ट लोकलने ठाण्याकडे येत होता. लोकलमधील गर्दीमुळे त्याला डब्ब्यात आत शिरता आले नाही. त्याचा तोल गेल्याने ठाकुर्ली स्थानकादरम्यान लोकलमधून तो बाहेर फेकला गेला. यात जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

तर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास जयेश कुडव या तरूणाचा लोकलमधील गर्दीने बळी घेतला. जयेश हा शहापूर तालुक्यातील मुसई (शेणवे) गावचा रहिवासी आहे. तो दिवा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. शहापूरहून आसनगावला येऊन तो लोकलने दिवा स्टेशनवर उतरत असे. संध्याकाळी पाच वाजता सुटल्यानंतर तो ठाण्यातील सक्सेस क्लासेसमध्ये जात. तेथून रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून आसनगावकडे जाणारी लोकल पकडत असे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री तो ठाण्यातून फास्ट लोकलने आसनगावकडे निघाला. मात्र लोकलमधील गर्दीमुळे तो कोपर स्थानकासमोर लोकलबाहेर फेकला गेला. जयेश हा लोकलखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीनंतर जयेशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जयेशच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा –

पवार उभे राहिले तरी १०० टक्के निवडणूक लढवणार – बिचुकले

First Published on: September 25, 2019 6:59 PM
Exit mobile version