रसायनशास्त्र अभ्यासमंडळाची पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला

रसायनशास्त्र अभ्यासमंडळाची पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाने बीएस्सी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तके तयार केली आहेत. कन्साईस ग्रॅज्युअट केमिस्ट्री -१, कन्साईस ग्रॅज्युअट केमिस्ट्री -२ आणि लॅबोरेटरी एक्पपेरिमेंट इन केमिस्ट्री अशी या पुस्तकांची नावे असून अत्यंत कमी दरात ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. प्राणीशास्त्र विषयाच्या पाठोपाठ रसायनशास्त्राची अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तके तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तकांचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करणे गरजेचे

”आजमितीस मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या जवळपास ६०० महाविद्यालयात रसायनशास्त्र विषय शिकवले जात असून १० हजाराहून अधिक विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रविष्ठ होत असतात. या अभ्यासक्रमासाठी पदवीच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र अभ्यासमंडळाने अथक प्रयत्न घेऊन विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तके तयार केली आहेत, ही अभिनंदनीय बाब असून भविष्यात यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात सुधारणा करून उत्कृष्ट दर्जाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जावी,” असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. भविष्यकालीन गरजा ओळखून अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करणे काळाची गरज असून त्या दृष्टिने रसायनशास्त्र अभ्यासमंडळासोबत इतरही अभ्यासमंडळाने मार्गक्रमण करावे असा मोलाचा सल्ला कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिला.


हेही वाचा – डॉ.पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपींना जामीन


उद्यापासून पुस्तके विक्रीसाठी

रसायनशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमात एकूण ३६ लेखक समूहातून ११ लेखकांनी ही पुस्तके तयार केली आहेत. तर प्रत्येक पुस्तकासाठी १२ प्राध्यापकांनी पुस्तकांचे पुनरावलोकन केले आहे. विशेष बाब म्हणजे या पुस्तकातील सर्व आकृत्या आणि चित्रे लेखकांनी स्वतः तयार केली आहेत. तर उर्कंड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाड़मयचौर्य परिक्षण करण्यात आले आहेत. प्रत्येक पुस्तकासाठी आयएसबीएन आणि बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला असून उत्तम दर्जाची पुस्तके विद्यापीठाने तयार केली असल्याचे रसायनशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आणि सहयोगी अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा प्राचार्य डॉ. रविंद्र देशमुख यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेली ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

First Published on: August 9, 2019 7:55 PM
Exit mobile version