Bridge collapse: हिमालय पूल हा ‘सुशोभीकरणचा’ बळी?

Bridge collapse: हिमालय पूल हा ‘सुशोभीकरणचा’ बळी?

फाईल फोटो

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेने मुंबईकरांचं मन हेलावून टाकलं. दरम्यान, सीएसएमटी परिसराचं सुशोभीकरण तर या पूल दुर्घटनेला जबाबदार नाहीये ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सीएसएमटी परिसराचे सुशोभीकरण करताना हिमालय पुलावर बसविण्यात आलेल्या आकर्षक लाद्यांमुळे भार वाढला. हा भार सोसण्यास पूल असमर्थ ठरल्यामुळे पूल गुरुवारी कोसळल्याचा संशय पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास अचानक हा पूल कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेमध्ये सुमारे ३४ लोत गंभीर जखमी झाले तर ६ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. दरम्यान, कोसळलेल्या पुलाच्या बांधकामाबाबत महापालिकाच दोषी असल्याचं म्हणत, पूल विभागाच्या दोन निवृत्त अधिकार्‍यांसह एकूण पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

आकर्षक बनवण्याचा अट्टहास?

‘स्वच्छ भारत अभियाना’साठी देशभरातील काही निवडक  पर्यटनस्थळांची निवड करण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचीदेखील निवड झाली होती.  या परिसरात असलेल्या हिमालय पुलाचे सुशोभीकरण, पदपथांची दुरुस्ती, इमारती एकसमान दिसाव्या यादृष्टीने रंगरंगोटी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. याच उपक्रमादरम्यान हिमालय पूल अधिक आकर्षक दिसावा या उद्देशातून लाद्या बसविण्यात आल्या. सुमारे १४ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या लाद्या बसवतावना आवश्यक ती काळजी घेण्यात न आल्यामुळे पुलावरचा भार वाढला आणि अखेर हे वजन न पेलवल्यामुळे पूल पडला, असं पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी गुप्तता बाळगण्याच्या अटीवर सांगितल्याचं समजत आहे. या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  ‘हिमालय पुलाची योग्य पद्धतीने तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची गरज होती. दुरुस्तीनंतर जर सुशोभीकरण केले गेले असते, तर कदाचित पूल पडला नसता.’

First Published on: March 16, 2019 11:28 AM
Exit mobile version