खासदार छत्रपती संभाजी राजे तिसऱ्या रांगेत, मंत्रालयातल्या बैठकीत गोंधळ!

खासदार छत्रपती संभाजी राजे तिसऱ्या रांगेत, मंत्रालयातल्या बैठकीत गोंधळ!

मंत्रालयाच्या सभागृहात आज सकाळी सारथी संस्थेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला आलेल्या छत्रपती संभाजी राजे यांना समोर खाली खुर्च्यांवर बसलेल्या सदस्यांमध्ये तिसऱ्या रांगेत बसवण्यात आलं. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा समाज समन्वयकांमध्ये नाराजी पसरली. त्यावर तीव्र आक्षेप घेत समन्वयकांनी संभाजी राजे यांना व्यासपीठावर बसावं असा आग्रह समन्वयकांकडून करण्यात येत होता. पण शेवटी संभाजी राजेंनी त्यांची समजूत काढून तिसऱ्या रांगेतच बसणं पसंत केलं.

सारथी संस्थेच्या निधीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीवरून संभाजी राजे उपस्थित झाले होते. त्यानंतर बैठकीला येऊन सदस्य म्हणून सहभागी असल्यामुळे संभाजी राजे तिसऱ्या रांगेत बसले. मात्र, त्यावर नाराज झालेल्या समन्वयकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. खुद्द अजित पवारांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही समन्वयक शांत होत नसल्याचं पाहून शेवटी संभाजी राजे यांनीच त्यांची समजूत काढली. ‘मी सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित झालेलो आहे. कोणत्याही मान-सन्मानासाठी मी आलेलो नाही. त्यामुळे मला सरकारला प्रश्न विचारता येतील. मी व्यासपीठावर बसलो, तर माझी भूमिका वेगळी होईल’, असं म्हणत संभाजी राजे यांनी तिसऱ्या रांगेतच बसण्याचा निर्णय घेतला. अखेर, या सगळ्या वादानंतर बैठक सुरळीत सुरू झाली.

First Published on: July 9, 2020 12:02 PM
Exit mobile version